कोल्हापूर: कोल्हापूर – पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोलनाका जवळ सोमवारी (२२ डिसेंबर) मध्यरात्री एका खासगी “अशोका ट्रॅव्हल्स” बसवर धाडसी सशस्त्र दरोडा करण्यात आला. या दरोड्यातून ६० किलो चांदी, १ तोळा सोनं, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू लुटल्या गेल्या, ज्याची अंदाजित किंमत सव्वा कोटींहून अधिक होती.
अधिक माहितीनुसार कोल्हापूर – पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोलनाका परिसरात कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या अशोका ट्रॅवल्स या खासगी प्रवासी बसवर सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. यावेळी आधीच प्रवासी म्हणून बसमध्ये चढलेल्या काही संशयितांनी चालकाला शस्त्राचा धाक दाखवून बस थांबवली. त्याचवेळी मागून कारमधून आलेल्या त्यांच्या साथीदारांनी बसच्या डिकीत ठेवलेले अंगडिया पार्सल कंपनीचे पार्सल मधील ६० किलो चांदी, १० ग्रॅम सोने व मशीन पार्ट्स असा सुमारे १.२५ कोटी रुपयांचा ऐवज लुटण्यात उचलून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत सात आरोपींना अटक करण्यात आली. तपासात बस क्लीनरचा सहभाग असल्याचा संशय असून, पार्सलची माहिती आतूनच पुरवली गेली असावी असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून ती कार विक्रमनगर कोल्हापूर येथे असल्याचे आढळून आले, तेथून आरोपी अक्षय कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या कडे अधिक चौकशी केली असता यामध्ये त्याचे इतर ६ साथीदार सहभागी असल्याचे उघड झाले. या सर्वांना टेंबलाई मंदिर परिसरात पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तपासादरम्यान बस क्लीनरचा सहभाग असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला असून, पार्सलविषयीची आतली माहिती आरोपींपर्यंत पोहोचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अक्षय बाबासाहेब कदम (रा. कोल्हापूर) असून त्याच्यासह जैद बशीर अफगाणी, अमन लियाकत सय्यद, सुजल प्रताप चौगुले, आदेश अरविंद कांबळे, आदिनाथ संतोष विपते (रा. सांगली) आणि सैपू बशीर अफगाणी अशा एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधीच रेकी करून काही जण प्रवासी म्हणून बसमध्ये चढले, तर उर्वरित आरोपी कारमधून मागोमाग आले होते. बस किणी टोलनाक्याजवळ येताच चालकाला शस्त्राचा धाक दाखवून बस थांबवण्यात आली आणि डिकीत ठेवलेले अंगडिया पार्सल काही मिनिटांत लंपास करून आरोपी पसार झाले होते.
आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून, वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणाऱ्या या घटनेत पोलिसांच्या जलद कारवाईमुळे मोठी टोळी जेरबंद करण्यात यश आले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.