सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • एकनाथ शिदेंना ठाण्यात मोठा धक्का! मिनाक्षी शिंदे यांचा शिवसेनेचा राजीनामा
  • लाखोंच्या जनआक्रोशासमोर केंद्र सरकारचं लोटांगण; अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी
  • मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, नजीब मुल्लांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या, ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हं!
  • हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडवर, नायलॉन मांजावर संक्रांत; पालकांना 50 हजार, दुकानदारास अडीच लाखांच्या दंडाचा प्रस्ताव
  • विचारसरणीच्या मुद्द्यावर पवारांची 26 वर्षांची साथ सोडली प्रशांत जगतापांची काँग्रेसमध्ये नवी इनिंग; घाऊक पक्षांतरांच्या काळात ठळक ठरणारा निर्णय
 जिल्हा

डोंगरदऱ्यातील जनतेचा आधारवड हरपला – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

डिजिटल पुणे    25-12-2025 17:09:22

नंदुरबार  : धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्व. स्वरुपसिंगजी नाईक यांच्या निधनाने डोंगरदऱ्यातील सर्वसामान्य, उपेक्षित व आदिवासी जनतेसाठी आयुष्यभर झटणारा एक लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे भावोत्कट विधान आज राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.माजी मंत्री स्व. स्वरुपसिंग नाईक यांच्यावर आज नवागाव (ता. नवापूर) येथे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपस्थित राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले त्या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री रावळ बोलत होते.

यावेळी गुजरात चे राज्यमंत्री जयराम गावित, खासदार गोवाल पाडवी, आमदार सर्वश्री अमरीश पटेल राजेश पाडवी, आमशा पाडवी, राम भदाणे श्रीमती मंजुळा गावित, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, के.सी. पाडवी, पद्माकर वळवी, माजी आमदार कुणाल पाटील, शरद पाटील स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी बोलताना मंत्री श्री. रावल म्हणाले, धुळे–नंदुरबार जिल्ह्याचे प्रदीर्घकाळ प्रभावी नेतृत्व स्वर्गीय नाईक यांनी केले. आदिवासी विकासमंत्री पदासह अनेक महत्त्वाची मंत्रिपदे त्यांनी अत्यंत कुशलतेने व जबाबदारीने सांभाळली. सलग 40 वर्षे विधानसभेवर निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. ही केवळ राजकीय कारकीर्द नव्हे, तर त्यांच्या कार्यावर, प्रामाणिकपणावर आणि नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेली नितांत श्रद्धा होती.

आदिवासी विकास, सामाजिक न्याय आणि दुर्गम भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. सत्तेच्या पदांवर असतानाही सामान्य माणसाशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही. त्यांची साधी राहणी, स्पष्ट भूमिका आणि माणुसकीची जाण यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून ओळखले जात होते.

स्व. नाईकांचे सर्व पक्षीय नेत्यांशी घनिष्ठ व जिव्हाळ्याचे संबंध होते. हे नाते त्यांनी केवळ एका पिढीपुरते न ठेवता पुढील पिढीशीही आत्मीयतेने जपले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आपुलकी, स्नेह आणि माणुसकी याची हीच खरी ओळख होती.

स्व. स्वरुपसिंगजी नाईक यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक सहवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशा प्रार्थना त्यांनी यावेळी व्यक्त केली.याप्रसंगी उपस्थित गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित, खासदार गोवाल पाडवी, आमदार सर्वश्री अमरीश पटेल राजेश पाडवी,आमशा पाडवी, राम भदाणे श्रीमती मंजुळा गावित, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, के.सी. पाडवी, पद्माकर वळवी, माजी आमदार कुणाल पाटील, शरद पाटील यांनीही आपल्या श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.


 Give Feedback



 जाहिराती