पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील एका नामांकित शाळेत गुरु–शिष्य नात्याच्या मर्यादांना छेद देणारा आणि समाजाला विचार करायला लावणारा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील एका विद्यार्थिनीने आपल्याच शिक्षिकेला वारंवार अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवत प्रेम व्यक्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, प्रेम स्वीकारले नाही तर आत्महत्येची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी ही शिक्षिकेला मोबाईलवर सातत्याने हार्ट इमोजी, ‘आय लव्ह यू’सारखे संदेश पाठवत होती. “तुम्ही मला खूप आवडता, तुम्ही दुसऱ्यांशी बोललेले मला चालत नाही, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही,” असे मेसेज तीने शिक्षिकेला पाठवल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकारानंतर शिक्षिकेने विद्यार्थिनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थिनी समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसून आले. तिने ब्लेडच्या साहाय्याने स्वतःच्या हातावर शिक्षिकेचे नाव कोरले आणि त्याचे फोटो शिक्षिकेला पाठवले. तसेच, प्रेम स्वीकारले नाही तर शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेल, अशी धमकीही दिल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे शिक्षिकेने तत्काळ शाळा प्रशासनाला माहिती दिली.
शाळा प्रशासनाने याबाबत चौकशी केली असता आणखी धक्कादायक बाबी उघड झाल्या. संबंधित विद्यार्थिनीने यापूर्वी इतरही विद्यार्थिनींना ‘आय लव्ह यू’ प्रकारचे संदेश पाठवले होते. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीला वॉशरूममध्ये अडवून, “तू खूप सुंदर दिसतेस, तुला बॉयफ्रेंड आहे का?” असे विचारल्याची माहितीही पुढे आली
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शाळा व्यवस्थापनाने तातडीने आणि अत्यंत संयमाने पावले उचलली. सर्वप्रथम विद्यार्थिनीच्या पालकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थिनीचे समुपदेशन करण्यात आले. तारुण्यावस्थेतील भावनिक आकर्षण, हार्मोनल बदल तसेच सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे ही विद्यार्थिनी भरकटली असावी, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.