पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात चपलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात बारा ते पंधरा विद्यार्थी जखमी झाले आहेत.शाळेच्या क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थी पिकअप वाहनातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.
नाशिकमधील खाजगी रुग्णालयात चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. इतर किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.