मुंबई : महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका आम आदमी पार्टी (आप) स्वतंत्रपणे आणि स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशानुसार कुठल्याही पक्षाशी युती किंवा आघाडी न करता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आपचे राज्य कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, माध्यमांमध्ये युती अथवा आघाडीबाबत येत असलेल्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असून त्यात कोणतेही तथ्य नाही.“आम आदमी पार्टी महाराष्ट्रात सक्षमपणे, संघटनात्मक ताकदीवर आणि जनतेच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, महाराष्ट्रात आप पक्षाची संघटन बांधणी वेगाने सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.