सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
  • उद्धव ठाकरे जुना वाद विसरले, ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांच्याशी पुन्हा हात मिळवला, अकोल्यात बच्चू कडूंच्या प्रहार अन् ठाकरे गटाची युती
  • ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट; अमेरिकेत कंपन्यांच्या दिवाळखोरीचा 15 वर्षांचा उच्चांक
  • मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार, मध्यरात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
  • मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
 जिल्हा

बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत

डिजिटल पुणे    29-12-2025 10:52:35

मुंबई  : बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) देण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला बिहार राज्यातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याने संयुक्तपणे केली आहे.

या प्रकरणी दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी जालना येथील सहायक मोटार वाहन निरीक्षक तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अभिजीत कडुबा बावस्कर यांनी फिर्याद दिली होती. अज्ञात आरोपींनी बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून शासकीय प्रक्रियेचा गैरवापर करीत आर्थिक लाभासाठी नागरिकांना बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. त्यावरून सायबर पोलीस ठाणे, जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याचे पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी नामे बिड्डराज प्रमोद यादव (वय 24, रा. टेंगराहा, जि. सहरसा, बिहार) हा आपले वास्तव्य वारंवार बदलत असल्याचे निष्पन्न झाले. अखेर दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी पटना, सिमरी बख्तियारपूर व सहरसा परिसरात शोध मोहीम राबवून त्याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला लॅपटॉप, आयफोन, थंब मशीन असा सुमारे 1 लाख 46 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीस 28 डिसेंबर 2025 रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्यात यापूर्वी जम्मू-काश्मीर येथील फैसल बशीर मीर आणि जालना येथील मुजाहिद उर्फ डॉन रईसोद्दीन अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक जालना, अपर पोलीस अधीक्षक तसेच सहरसा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली, असे परिवहन आयुक्त, मुंबई यांनी कळविले आहे.


 Give Feedback



 जाहिराती