नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तलई येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणात महिला अधीक्षिकेचेही संगनमत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
पीडित विद्यार्थिनीने हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुख्याध्यापक व महिला अधीक्षिकेवर गुन्हा दाखल
प्राथमिक चौकशीत अत्याचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर नराधम मुख्याध्यापक रायसिंग वसावे तसेच व्यवस्थापिका (महिला अधीक्षिका) मालती पाडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून आरोपीला मदत केल्याचा ठपका अधीक्षिकेवर ठेवण्यात आला आहे.
दोघांचे तात्काळ निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
या गंभीर प्रकरणाची दखल घेत अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका या दोघांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबन काळात मुख्यालय न सोडण्याचे निर्देश देण्यात आले असून, सविस्तर विभागीय चौकशीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. चौकशी अहवालानंतर दोष सिद्ध झाल्यास आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आदिवासी संघटनांचा संताप
या घटनेनंतर आदिवासी संघटनांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात येत आहे.