पुणे : पुण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागलं असून, 2017 मधील गाजलेला सामना पुन्हा रंगणार असल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे गटनेते गणेश बिडकर असा थेट सामना पुन्हा होणार आहे. यावेळी मात्र रविंद्र धंगेकर स्वतः रिंगणात नसून, त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत आहेत.
माजी आमदार रविंद्र धंगेकरांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक 23 मधून, तर त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक 24 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा धंगेकर आणि बिडकर आमने-सामने येणार असून, 2017 ची पुनरावृत्ती होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रभाग 23 आणि 24 मध्ये थेट लढत
भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यात पुणे महापालिकेसाठी ठोस युती न झाल्याने अनेक प्रभागांमध्ये थेट लढती होत आहेत.
प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रणव धंगेकर यांची थेट लढत भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांच्या विरोधात होणार आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी गणेश बिडकरांचा पराभव केला होता. आता त्याच मतदारसंघात धंगेकरांचे सुपुत्र प्रणव बिडकरांसमोर उभे ठाकल्याने या लढतीकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलं आहे.
पुणे महापालिकेत युती-आघाडी कागदावरच?
पुणे महापालिकेच्या 165 जागांसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात आघाडी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आमदार रोहित पवार यांनी देखील पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याचं सांगितलं होतं.
मात्र प्रत्यक्षात पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी किती जागा लढवत आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अंकुश काकडे यांनी अनेक वेळा विचारणा होऊनही नेमकी आकडेवारी जाहीर केलेली नाही. काकडे यांनी 70 पेक्षा अधिक एबी फॉर्म वाटल्याचा दावा केला असला तरी अनेक प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे भाजप-शिंदे सेना युतीप्रमाणेच, पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी देखील कागदावरच मर्यादित राहिल्याचं चित्र समोर येत आहे.
पुणे महापालिका निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे : 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी : 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी : 03 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026
मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026