सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 जिल्हा

पंढरपूरात ऐतिहासिक निर्णय! मंदिरातील भंग पावलेल्या ३७ मूर्ती बदलणार

डिजिटल पुणे    01-01-2026 15:59:42

पंढरपूर : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रशासनाने एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मंदिरातील जतन व संवर्धनाच्या कामादरम्यान भंग पावलेल्या एकूण ३७ मूर्ती बदलण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

सध्या सुरू असलेल्या संवर्धन कामाच्या पाहणीत मंदिर परिसरातील परिवार देवतांच्या काही मूर्ती शेकडो वर्षांपूर्वीच्या असून त्या भंग पावलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. मंदिरातील २४ आणि मंदिराबाहेरील २८ परिवार देवतांपैकी ३७ मूर्ती भग्न असल्याचा अहवाल पुरातत्व विभागाचे अधिकारी, संबंधित आर्किटेक्ट आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या संयुक्त पाहणीत समोर आला.

हिंदू धर्मशास्त्रानुसार मंदिरात भग्न मूर्तींची पूजा केली जात नसल्याने या मूर्ती बदलणे आवश्यक असल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्पष्ट केले. मूर्तींवरील जुना लेप काढल्यानंतर त्यांची प्रत्यक्ष अवस्था समोर आली असून, त्या जागी बसवण्यासाठी नव्या मूर्ती तयार करण्याचे काम पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार भंग पावलेल्या मूर्तींच्या जागी नव्या मूर्ती तयार करून घेण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी परिवार देवतांच्या मंदिरांची कामे पूर्ण झाली आहेत, त्या ठिकाणी येत्या आठ दिवसांत धार्मिक विधी करून नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

दरम्यान, बदलण्यात येणाऱ्या शेकडो वर्षांपूर्वीच्या पुरातन मूर्ती नष्ट न करता त्या मंदिर परिसरातच संग्रहालय (म्युझियम) स्वरूपात जतन करून ठेवल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे धार्मिक परंपरेचे पालन तर होणारच, शिवाय पंढरपूरच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धनही साध्य होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती