सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
  • मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
  • नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, भाजपकडून पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप; तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप
  • पुण्यात भाजप अन् शिवसेनेची युती तुटली नाही; एबी फॉर्म दिलेत पण....; उदय सामंतांनी युतीचं चित्र केलं स्पष्ट
 राजकारण

पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य

डिजिटल पुणे    01-01-2026 17:53:21

पुणे : राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळून आली असून, विद्यमान नगरसेवकांना डावलल्यामुळे पक्षासमोर गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत.

पुण्यात भाजपसमोर अंतर्गत बंडाळीचे संकट

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने यंदा निम्म्याहून अधिक विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी नाकारली आहे. तब्बल ४२ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आल्याने पक्षात तीव्र असंतोष पसरला आहे. काही नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, काहीजण अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या बंडखोरीचा थेट फटका भाजपला बसू शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादीची एकजूट, ताकद वाढण्याची चिन्हे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे पुण्यात राष्ट्रवादीची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे. भाजपसोबतची चर्चा फिस्कटल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही राष्ट्रवादीसोबत युतीसाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. आज शिवसेना–राष्ट्रवादी युतीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपमधून राष्ट्रवादीत पक्षांतर

तिकीट नाकारल्यामुळे भाजपमधून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू झाले आहे. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. “पक्षाने माझा अपमान केला,” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

प्रभाग क्रमांक २७ (नवी पेठ–पर्वती) येथून उमेदवारीची अपेक्षा असलेले धनंजय जाधव यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष

‘दीनानाथ प्रकरणा’तील तनिष्का भिसे यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानेही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रियांका भिसे या सर्वेक्षणात आघाडीवर असतानाही त्यांना डावलून अन्य उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

भाजपने डावललेले विद्यमान नगरसेवक

भाजपने खालील विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी नाकारली आहे —

ऐश्वर्या जाधव, मारुती सांगळे, आयुब शेख, श्वेता गलांडे-खोसे, मुक्ता जगताप, सुनीता गलांडे, संदीप जराड, सोनाली लांडगे, राजश्री काळे, आदित्य माळवे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, स्वप्नाली सायकर, ज्योती कळंबकर, अमोल बालवडकर, श्रद्धा प्रभुणे, हर्षाली माथवड, दीपक पोटे, माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे, स्वाती लोखंडे, नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, राजेश येनपुरे, योगेश समेळ, सुलोचना कोंढरे, विजयालक्ष्मी हरियार, आरती कोंढरे, सम्राट थोरात, मनीषा लडकत, संजय घुले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबोले, सरस्वती शेंडगे, आनंद रिठे, शंकर पवार, वृषाली चौरे, नीता दांगट, राजश्री नवले, दिशा माने.

पुणे महापालिका निवडणूक रंगतदार

एकीकडे राष्ट्रवादीची एकजूट आणि संभाव्य युती, तर दुसरीकडे भाजपमधील मोठी बंडखोरी — या सगळ्या घडामोडींमुळे पुणे महानगरपालिकेची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती