पिंपरी : भीमा कोरेगाव येथे मानवंदनेसाठी निघालेल्या अनुयायांचा पिकअप टेम्पो मरकळ मार्गे पेरणे फाटा कडे जात असताना रेवीन केबल कंपनीजवळ पलटी झाला. ही घटना आज दुपारी घडली. या अपघातात टेम्पोमधील महिला, लहान मुले व पुरुष असे सुमारे १० ते १५ जण जखमी झाले आहेत.अपघातग्रस्त पिकअप टेम्पोचा क्रमांक MH-14/LB-3097 असा असून, सर्व जखमी अनुयायी हे कुरुळी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना उपचारासाठी के. के. हॉस्पिटल येथे दाखल केले आहे.
अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.