पुणे : राज्यभर बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्याचा सपाटा लावणाऱ्या भाजपने पुण्यातही खाते उघडले आहे. पुणे महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत होणार असली तरी भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 35 (सनसिटी–माणिकबाग) मधून मंजुषा नागपुरे, तर प्रभाग क्रमांक 35 ड मधून श्रीकांत जगताप हे भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जोरदार जल्लोष करण्यात आला.
राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदे गटाची शिवसेना आणि काँग्रेस–ठाकरेंची शिवसेना अशी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पुण्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. तर अजित पवार यांनीही पुणे महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे.
अर्ज माघारीमुळे बिनविरोध विजय
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक 35 मधून मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या. या प्रभागातून एकूण सहा अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन अर्ज छाननीत बाद झाले, तर उर्वरित तीन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. परिणामी मंजुषा नागपुरे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला.
त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 35 ड या सर्वसाधारण जागेसाठी नितीन गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे निवडणूक होण्याआधीच भाजपने पुण्यात दोन जागांवर विजय मिळवला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावरून दोन्ही राष्ट्रवादीतील युती फिस्कटल्याची चर्चा होती. मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले असून पुणे महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी संयुक्तपणे लढवणार आहेत. पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 40 जागांवर ‘तुतारी’ चिन्हावर उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
दुसरीकडे, पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. शिंदे गटाची शिवसेना 123 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असून, उद्धवसेना–मनसे युतीही झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आलेल्या काही जागांवर मनसे उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.भाजप आणि शिंदे गटाची युती न झाल्याने पुणे महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत अटळ ठरणार आहे.