पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये सुरू असलेल्या प्रचाराला मोठा धक्का बसला असून, मतदारांना पैसे वाटप केल्याचे गंभीर आरोप आणि त्यासंदर्भातील महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. भाजपचे प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार गणेश कळमकर , लहू बालवडकर, रोहिणी चिमटे आणि मयुरी कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्यावर थेट आरोप करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भाजप कडून समीर चांदेरे यांना निवडणूक काळात तडीपार करण्याची तीव्र मागणी करण्यात अली आहे,
मतदारांची नावे, रोख रक्कम आणि व्हायरल व्हिडिओ
भाजप उमेदवार गणेश कळमकर , लहू बालवडकर, रोहिणी चिमटे आणि मयुरी कोकाटे यांच्या आरोपानुसार, प्रभाग क्रमांक ९ मधील काही भागांत मतदारांची नावे नोंदवून एका महिलेमार्फत रोख रक्कम वाटप करण्यात येत होते. याच घटनेचा असल्याचा दावा करण्यात येणारा एक महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामुळे या आरोपांना अधिक धार मिळाली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिला मतदारांची नावे आणि पैशांबाबत बोलताना दिसत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. हा व्हिडिओ खरा असल्यास तो निवडणूक आचारसंहितेचा गंभीर भंग असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
भाजपचा थेट आरोप : पैशांच्या जोरावर सत्ता टिकवण्याचा प्रयत्न
भाजपकडून या प्रकरणात केवळ आरोप न करता थेट राजकीय भूमिका घेतली जात आहे. “पैशांच्या जोरावर मत विकत घेण्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. सत्ताधाऱ्यांच्या जवळचा माणूस असल्याने प्रशासन डोळेझाक करत आहे,” असा थेट आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री स्तरावर तक्रार, कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत गणेश कळमकर , लहू बालवडकर, रोहिणी चिमटे आणि मयुरी कोकाटे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून तक्रार केल्याचे सांगितले आहे. तसेच व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासून, दोषी आढळणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
समीर चांदेरे यांची पार्श्वभूमी आणि वाढती अडचण
समीर चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे पुणे शहर युवक अध्यक्ष असून, ते पक्षाचे वरिष्ठ नेते बाबुराव चांदेरे यांचे पुत्र आहेत. बाबुराव चांदेरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. यापूर्वीही समीर चांदेरे यांच्यावर विविध वादग्रस्त आरोप झालेले आहेत.