पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘कृष्ण-कृष्ण’ हा स्वराविष्कार कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाला. सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.'कृष्ण रसगान आणि कृष्ण रसपान’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात श्रीकृष्णाच्या विविध भावछटांचे संगीतमय सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना, काव्य आणि संहिता डॉ. शुभांगी शिरढोणकर (इंदूर) यांची होती. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी जीवन धर्माधिकारी यांनी समर्थपणे सांभाळली.
गायक जितेंद्र अभ्यंकर आणि स्वरदा गोखले-गोडबोले यांनी आपल्या सुरेल आणि भावस्पर्शी गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणातून भक्ती, शृंगार, करुणा आणि आध्यात्मिक आनंद यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी प्रभावीपणे केले.संपूर्ण सभागृहात आध्यात्मिक आणि सांगीतिक वातावरण निर्माण झाले , रसिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम सांस्कृतिक रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील २७१ वा कार्यक्रम होता,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.माउली टाकळकर,हेमंत पेंडसे,जीवन धर्माधिकारी,केदार परांजपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.हेमंत पेंडसे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.