पुणे: गैइयाफ्लक्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (एमआयडीसी) यांच्या सहकार्याने करिअर मार्गदर्शन व उद्योजकता सहाय्यासाठी विकसित करण्यात आलेल्या 'करिअरग्राम' या ऑनलाइन व्यासपीठाचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता तळेगाव दाभाडे येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे.या उद्घाटन समारंभास गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार पद्मश्री डॉ. शरद काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून सिंधुदुर्ग जिल्हा जात वैधता समितीच्या अध्यक्षा व अतिरिक्त जिल्हाधिकारी सौ. समीक्षा चंद्राकर गोकुळे या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गैइयाफ्लक्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक व संचालक प्रा. डॉ. दीपक ताटपुजे हे सहभागी विद्यार्थी व उपस्थितांशी संवाद साधून करिअरग्राम उपक्रमाची सविस्तर माहिती देणार आहेत.इयत्ता आठवी ते बारावीतील ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता ओळखून सुज्ञ करिअर निर्णय घेता यावेत तसेच भविष्यातील कौशल्य विकास व उद्योजकतेच्या संधींचा शोध घेता यावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती रजनीगंधा खांडगे यांनी दिली. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संतोष खांडगे, मोहिनी शर्मा, प्रवीण भोसले आणि संदीप मगर यांनी केले आहे.
ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थी व युवकांसाठी शास्त्रीय, संरचित आणि सहज उपलब्ध करिअर मार्गदर्शनाची गरज लक्षात घेऊन करिअरग्राम या उपक्रमाची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. या व्यासपीठामध्ये तंत्रज्ञानाधारित करिअर मूल्यमापन, वैयक्तिक समुपदेशन तसेच उद्योजकतेसाठी संरचित सहाय्य यांचा समन्वय करण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवड, कौशल्य विकास आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.युवक सक्षमीकरणासाठी शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या माध्यमातून कार्य करण्याची गायाफ्लक्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडची बांधिलकी या करिअरग्राम उपक्रमातून अधोरेखित होत आहे.