पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी 'महापुरुषांचे कार्य विवेचन' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांची जाणीव वाढवणे,विद्यार्थ्यांमध्ये नैतिक व मानवी मूल्यांची जाणीव निर्माण करून चारित्र्य, शिस्त, जबाबदारी, सामाजिक भान व योग्य निर्णयक्षमता विकसित करणे या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो हे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. मनोज मते ( उपाध्यक्ष- श्री. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर, देहू, पुणे) आणि दैनिक मावळचे पत्रकार मा. श्री. विशाल कुंभार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अभय पाटील, डॉ. सुरेश रसाळे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेची सुरुवात विद्यापीठ गीत, राष्ट्रीय सेवा योजना गीत आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली.या वेळी बोलताना प्रा. डॉ. मनोज मते यांनी महापुरुषांचे कार्य विवेचन या विषयावर मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज,गौतम बुद्ध,महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील ते बाबुरावजी घोलप साहेब इ.महापुरुषांचे विचार कार्य यांचा परिचय करून देत मूल्यांचे महत्त्व विशद केले.
स्वतंत्र आणि परतंत्र या संकल्पना स्पष्ट करत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्यावर भाष्य केले. पुढे त्यांनी समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची विविध दाखले देत ओळख करून दिली. यामध्ये संत तुकाराम, महात्मा फुले, संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांच्या कार्याची, त्यांच्या तत्त्वांची माहिती दिली. समाजसुधारकांनी तत्कालीन केलेल्या समस्यांच्या निराकरणाचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. पुढे त्यांनी प्रत्येक देशाने मिळविलेल्या राजकीय स्वातंत्र्याची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचसूत्रीची माहिती देताना ते म्हणाले की, सामाजिक लोकशाही देशात रुजवणे गरजेचे आहे, त्यासाठी आर्थिक जीवनामध्ये क्रांती घडवून आणावी लागेल. तसेच त्यांनी भारतातील बहुविधतेविषयी सखोल मार्गदर्शन केले.
मा. श्री. विशाल कुंभार यांनी मूल्यशिक्षण संकल्पना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान अधोरेखित केले. ते म्हणाले की, जगण्यासाठी आवश्यक असते ते मूल्यशिक्षण. पुढे त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची सखोल माहिती दिली. मानवतेची रुजवणूक करण्यासाठी तत्त्वाने जीवन जगण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, महापुरुष हे आपल्या आयुष्याच्या समर्पणानंतर बनतात. समाजातील प्रत्येक घटक हा सामाजिक न्याय देणारा असून जीवनात न्यायाची भावना महत्त्वाची आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी मूल्यशिक्षण ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले.सदर कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड.संदीप कदम, उपसचिव श्री.एल.एम.पवार, खजिनदार ॲड.मोहनराव देशमुख, प्रशासकीय सहसचिव श्री.ए.एम. जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. अभय पाटील , प्रा. दिलीप सोनवणे, प्रा. मीनाली चव्हाण यांनी काम पाहिले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, समितीतील सदस्य, प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मराठी विभागप्रमुख डॉ. विजय बालघरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रीकांत देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.