लातूर : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर लातूरच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावर अभिनेता तथा विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी संयमित पण तितक्याच खणखणीत शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
“लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही,” असे म्हणत रितेश देशमुख यांनी अप्रत्यक्षपणे रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपली भूमिका मांडली.
नेमकं काय म्हणाले होते रवींद्र चव्हाण?
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आलेल्या रवींद्र चव्हाण यांनी एका सभेत बोलताना,
“लातूरमधील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लवकरच या शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील,” असे विधान केले होते. या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून राजकीय वातावरण तापले आहे.
रितेश देशमुखांची प्रतिक्रिया चर्चेत
रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन्ही हात वर करून शांत पण ठाम शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेला नेटकऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दर्शवले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर हल्लाबोल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.ते म्हणाले,“स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा आजवर कुणीही जन्माला आलेला नाही. विलासराव देशमुख यांनी आपले संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केले. सत्तेच्या माजात बोलणाऱ्या भाजप नेत्यांना लातूरकरांच्या भावना समजणार नाहीत. भाजपवालो याद राखा, याचा करारा जवाब मिलेगा.”
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
या प्रकरणामुळे लातूरसह राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.