लातूर : दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, अभिनेता व विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांच्या सडेतोड प्रत्युत्तरानंतर चव्हाणांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे.
लातूरमध्ये आयोजित कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. “लातूरकरांचा उत्साह पाहता विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील,” असे वक्तव्य केल्याचा आरोप होत असताना, या पार्श्वभूमीवर रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत अप्रत्यक्ष शब्दांत चव्हाणांना प्रत्युत्तर दिले.
रितेश देशमुख यांचे प्रत्युत्तर
रितेश देशमुख म्हणाले, “दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र.”या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, नेटकऱ्यांनी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
रवींद्र चव्हाणांची दिलगिरी
वाद वाढल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, “लातूरमध्ये मी जे काही म्हटलं त्यात विलासराव देशमुख यांच्यावर कोणतीही टीकाटिप्पणी नव्हती. विलासराव हे खूप मोठे नेते होते आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले. काँग्रेस लातूरमध्ये विलासरावांवर फोकस ठेवून मतदान मागते, तर भाजप नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील विकासकामांवर भर देत आहे, या संदर्भात मी वक्तव्य केले होते. तरीही माझ्या वक्तव्यामुळे त्यांच्या चिरंजीवांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.”
राजकीय वातावरण तापले
या घटनेमुळे लातूरमधील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.