मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या ठाकरे बंधूंच्या (राज ठाकरे–उद्धव ठाकरे) स्फोटक मुलाखतीचा पहिला टीझर समोर आला असून तो चांगलाच चर्चेत आहे. ही संपूर्ण मुलाखत 8 आणि 9 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.टीझरमध्ये उद्धव ठाकरे म्हणताना दिसतात की, “राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावर असलं पाहिजे, सत्तेवर असता कामा नये.” तर राज ठाकरे म्हणतात, “मुंबईतील समस्या समजण्यासाठी मुंबईत जन्माला आलेलं असावं लागतं.”
संजय राऊत यांनी टीझरमध्ये थेट प्रश्न उपस्थित केला आहे की, “ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राला तब्बल 20 वर्षे का वाट पाहावी लागली?” यावर बोलताना राज ठाकरे यांनी, “मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे खटाटोप सुरू आहेत,” असा गंभीर दावा केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर बोलताना सावध राहावं, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महेश मांजरेकरांच्या विधानांनी वेधलं लक्ष
टीझरमध्ये महेश मांजरेकर यांनी मुंबईतील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या ठळकपणे मांडल्या. “मुंबईकर म्हणून आता घराबाहेर पडताना लाज वाटते. दहा मिनिटांचं अंतर पार करायला तासभर लागतो,” असं त्यांनी म्हटलं.यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना, “मुंबई खराब व्हायला वेळ लागला, पण पुण्याचं तसंच होणार नाही; पुणे लवकरात लवकर बरबाद होईल,” असा इशाराही दिला.बिनविरोध निवडणुकांवर प्रश्न उपस्थित करताना मांजरेकर म्हणाले, “जिथे बिनविरोध उमेदवार निवडून आले, तिथे लोक बोटावर शाई कशी दाखवणार?” यावर ठाकरे बंधूंनी “वाटलेल्या नोटांमुळेच हे सगळं घडलं,” अशी टीका केली आहे.तसेच साताऱ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ड्रग्ज सापडल्याच्या मुद्द्याचाही उल्लेख टीझरमध्ये करण्यात आला आहे.
निलेश राणेंचा पलटवार
दरम्यान, या मुलाखतीवर शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. “ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच होता. बाकी हे संपले आहेत. कार्यकर्ते सोबत नाहीत, उमेदवार मिळत नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.“प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पालिकेत कुठे-कुठे किती पैसे खाल्ले, हे सगळं बाहेर काढू,” असा इशाराही राणे यांनी दिला.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “राऊत कधी लोकांमधून निवडून आलेत का? एक सामाजिक काम दाखवावं.”“ठाकरे बंधूंची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. हे पालिका निवडणुकांत दिसून येईल,” असंही निलेश राणे यांनी स्पष्ट केलं.ठाकरे बंधूंची ही मुलाखत आणि त्यावर उमटणाऱ्या राजकीय प्रतिक्रिया यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडण्याची शक्यता आहे.