पुणे : अजित पवारांनी आधी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा आणि मग इतरांवर टीका करावी, असा जोरदार टोला भाजप आमदार महेश लांडगे यांनी लगावला आहे. अजित पवार हेच महाराष्ट्राचे खरे ‘आका’ असून स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठीच ते भाजपमध्ये आले आहेत, असा गंभीर आरोप करत लांडगेंनी अजितदादांना थेट राजकीय आव्हान दिलं आहे.
अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारावरून केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना महेश लांडगे चांगलेच आक्रमक झाले. “जो स्वतःच्या काकाचा होऊ शकला नाही, तो पिंपरी-चिंचवडचा कसा काय होणार?” असा सवाल करत त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली.
‘अजित पवार नैराश्यात आहेत’
“सध्या अजित पवारांचा अहंकार बोलतो आहे. ते नैराश्यात आहेत,” असा घणाघाती हल्लाबोल करत लांडगेंनी, पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा ‘आका’ संपवायचा असल्याचा दावा अजित पवार करत असल्यावरही सवाल उपस्थित केला.
‘पार्थ पवारांचा पराक्रम पाहा’
“स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अजित पवारांनी आमच्यावर आरोप करू नयेत. आधी मुलगा पार्थ पवारांचे पराक्रम पाहा,” असा इशाराही महेश लांडगेंनी दिला.तसेच, “आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे असतील तर मी, पालिका प्रशासन आणि अजितदादांनी समोरासमोर बसावं. मग सगळी उत्तरं मिळतील,” असं खुलं आव्हान त्यांनी दिलं.
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजकीय कुस्ती’ रंगणार?
एकेकाळचे ‘वस्ताद’ असलेले अजित पवार विरुद्ध ‘पैलवान’ महेश लांडगे अशी थेट राजकीय कुस्ती आता पिंपरी-चिंचवडच्या आखाड्यात रंगणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे स्थानिक राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.