पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘एक अलार्म, पाच कामे’ हे विशेष कॅंपेन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यातील खड्डे, कचरा, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि गुन्हेगारी या मुद्द्यांवर रॅप सॉंगच्या माध्यमातून भाजपच्या स्थानिक कारभारावर टीका करण्यात आली आहे.हे गाणे फक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या कारभारापुरते मर्यादित असून, त्याचा केंद्र किंवा राज्य सरकारशी कोणताही संबंध नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. कचरा, तुटलेले रस्ते, पाणीटंचाई, गुन्हेगारी आणि वाहतूक कोंडी हेच पुण्याचे खरे “अलार्म” असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेतील टेंडर पद्धतीवर टीका
महापालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिले जातात, त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसतो, असा आरोप अजित पवार यांनी केला. कागदावर योजना असल्या तरी प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे पुणेकरांना रोजच्या रोज अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे ते म्हणाले.
“तुमचे सगळे प्रश्न सोडवून दाखवू”
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका अनेक आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत अजित पवार म्हणाले, “लोकांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे गाणे लाँच केले आहे. माझा प्रशासनातील अनुभव आहे. तुमचे सगळे प्रश्न सोडवून दाखवू.”
एक अलार्म लावून लोकांच्या अडचणी समोर आणायच्या आणि त्या सोडवायच्या, हाच या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरी समस्या आ वासून उभ्या
कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पाणीटंचाई, टँकर माफिया, गुन्हेगारी अशा समस्या पुणे आणि पिंपरीमध्ये गंभीर स्वरूपाच्या असल्याचे अजित पवार म्हणाले. अनेक प्रभागांत रोड शो केले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रतिसाद मतदानात रूपांतरित व्हावा, असे आवाहन त्यांनी केले.
हवेची गुणवत्ता ढासळतेय
पुण्यात हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असून प्रदूषण वाढत आहे. हजारो कर्मचारी स्वच्छतेसाठी काम करत असतानाही रस्त्यांवर कचरा दिसतो, अशी टीका अजित पवार यांनी केली. कुत्र्यांच्या नसबंदीवर खर्च करूनही हजारो चाव्यांच्या घटना घडल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
10 तारखेला जाहीरनामा
‘एक अलार्म, पाच कामे’ या संकल्पनेवर आधारित जाहीरनामा 10 तारखेला जाहीर केला जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. “नुसत्या उणिवा दाखवणार नाही, तर आम्ही काय करणार आहोत तेही स्पष्ट सांगू. पुणेकरांना विश्वास देऊ,” असे ते म्हणाले.