छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेला जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांनी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षण विभागातील विविध घटक सहभागी झाले होते.
दशसूत्री उपक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम, जबाबदार आणि समाजाभिमुख पिढी घडविण्याची गरज जिल्हाधिकारी स्वामी यांनी अधोरेखित केली. शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्य, संवेदनशीलता आणि सामाजिक भान निर्माण करण्याची प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॉपीमुक्त अभियान, संस्कार शिक्षण आणि शालेय वातावरणातील नैतिक मूल्यांची जोपासना यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशासनाच्या चौकटीपलीकडे जाऊन शिक्षण विभागासाठी वेळ देणे, दिशा देणे आणि विचार मांडणे हे खऱ्या नेतृत्वाचे लक्षण असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यशाळेतील मार्गदर्शन केवळ प्रशासकीय नसून, विचारप्रवर्तक आणि आत्मपरीक्षण घडविणारे असल्याचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी मोबाईलच्या प्रकाशातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याप्रती शांत, निःशब्द पण अर्थपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली. हा क्षण माध्यमिक शिक्षण विभागासाठी स्मरणीय ठरला.
या प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी व संपूर्ण माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे योग्य दिशेने वाटचाल करण्याचा आत्मविश्वास मिळाल्याची भावना शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी व्यक्त केली.