नवी दिल्ली : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता भरत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत राजधानी दिल्लीत अस्सल मराठमोळ्या चवीचा आणि संस्कृतीचा अनुभव देणारा ‘हुरडा पार्टी’ व ‘मकर संक्रांत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात 9 ते 11 जानेवारी दरम्यान दुपारी 12 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत हा महोत्सव होणार असल्याची माहिती निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी दिली.
मराठी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे ‘पछाडलेला’, ‘जत्रा’, ‘अगं बाई अरेच्चा!’, ‘साडे माडे तीन’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटातील भूमिकांमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते भरत जाधव यांच्याहस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.
डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र खाद्य महोत्सवाला दिल्लीकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, हिवाळी हंगामाची खास मेजवानी म्हणून यंदा ‘हुरडा पार्टी’चे आयोजन करण्यात आले आहे.मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात तिळगूळ, शेकोटीवर भाजलेला हुरडा आणि ग्रामीण संस्कृतीचा अनुभव दिल्लीकरांना मिळणार आहे.
पुणे, सोलापूर, नाशिक आणि मराठवाड्यातील शेतात जसा हुरड्याचा आनंद घेतला जातो, तसाच अनुभव येथे देण्यात येणार आहे. हुरड्यासोबत खमंग लसूण चटणी, शेंगदाणा कूट, पिवळाधमक गूळ, साजूक तूप, ताक, तसेच चुलीवरचे वाफाळलेले पिठलं-भाकरी, भरीत भाकरी, बटाटेवडे, भजी, याशिवाय ऊस, बोरं, ओला हरभरा अशा अस्सल गावरान पदार्थांची रेलचेल असणार आहे.
महोत्सवाचे एक आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे १० जानेवारी २०२६ रोजी आयोजित विशेष कला स्पर्धा होय. ‘फाईन लाईन आर्ट अकॅडमी’ तर्फे नवोदित कलाकार तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘लाईव्ह पेंटिंग’ (Live Painting Activity) हा उत्साहवर्धक उपक्रम राबवला जाणार आहे. हा उपक्रम दिनांक १० जानेवारी २०२६, वेळ दुपारी १२:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत असणार आहे आणि विशेष सवलत म्हणून स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य जसे कॅनव्हास, रंग, ब्रशेस मोफत पुरवले जाणार आहे. हा उपक्रम कलाक्षेत्रातील नव्या प्रतिभांना व्यासपीठ देण्यासाठी आणि महोत्सवाला कलात्मक रंगत प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक कलाकार व विद्यार्थी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपली सर्जनशीलता प्रदर्शित करू शकतात
महोत्सवाच्या निमित्ताने संक्रांत वाणासाठी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. थंडी, शेकोटीची ऊब, पारंपरिक संगीत आणि हुरड्याचा आस्वाद असा दुग्धशर्करा योग या महोत्सवात अनुभवता येणार आहे.
शहर आणि गाव यांना जोडणारा हा उपक्रम दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या अधिक जवळ घेऊन जाणारा ठरणार आहे.9 ते 11 जानेवारी दरम्यान नवीन महाराष्ट्र सदन येथे होणाऱ्या या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या आदरातिथ्याचा, चवीचा आणि संस्कृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त आर. विमला आणि गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी केले आहे.