मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच गुरुवारी एक अनपेक्षित राजकीय घडामोड घडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुंबईत अचानक भेट झाली.
मुंबईतील एका हिंदी वृत्तवाहिनीच्या स्टुडिओत दोन्ही नेते कार्यक्रमासाठी आले असताना ही भेट झाली. एकनाथ शिंदे यांची मुलाखत संपून ते बाहेर पडत असतानाच संजय राऊत मुलाखतीसाठी स्टुडिओकडे जात होते. समोरासमोर येताच दोघांनीही एकमेकांना पाहून अभिवादन केलं.
या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच गंभीर आजारातून बरे झालेल्या संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राऊत आजारी असताना शिंदेंनी त्यांचे बंधू सुनील राऊत यांच्याशी फोनवरून संपर्क साधून तब्येतीची चौकशी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज प्रत्यक्ष भेटीतही दोघांमध्ये सौजन्यपूर्ण संवाद झाला. संजय राऊत यांनीही शिंदेंच्या तब्येतीची विचारणा केली.
एक-दोन मिनिटांच्या संवादानंतर दोन्ही नेते आपापल्या दिशेने रवाना झाले. मात्र, या भेटीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
शिवसेनेतील फाटाफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान संजय राऊत सातत्याने एकनाथ शिंदेंवर टीका करत असतानाच आजची ही सौजन्यपूर्ण भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.