उरण : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा उरणच्या वतीने ७ जानेवारी १९५४ सालापासून सुरू असणाऱ्या या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा उरण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी निर्मला घरत यांनी भूषविले.सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज. सरस्वती माता व दादासाहेब दोंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक उरण शाखेचे अध्यक्ष हेमंत गावंड यांनी मांडले. प्रास्ताविकामध्ये शिक्षकांच्या विविध समस्या,अडचणी सोडवण्यासाठी ही संघटना सदैव कटिबद्ध आहे. ही संघटना फक्त महाराष्ट्रपूरती मर्यादित नाही किंवा देशापूरती मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर संलग्न असणारी ही संघटना आहे.
सध्या शिक्षकांना भेडसावत असणारा टीईटी परीक्षेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका मांडणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे. या वर्धापनदिनी संघटनेच्यावतीने दरवर्षी तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा, शिष्यवृत्ती धारक होणाऱ्या विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न केला जातो. यावर्षी देखील तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रत्येक केंद्रातून एक अशा पाच उत्कृष्ट शिक्षिकेंचा आदर्श शिक्षिका म्हणून गौरव करण्यात आला. तसेच उरण तालुक्यातून सेवानिवृत्त झालेल्या सर्व सेवानिवृत्त बंधू-भगिनींचा देखील शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे तालुक्यातून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला. तदनंतर अनेक मान्यवरांनी या संघटनेबद्दल व त्यांनी सुरू ठेवलेल्या स्तुत्य अशा उपक्रमाबद्दल गौरवोदगार काढले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा निर्मला घरत यांनी या संघटनेचा इतिहास तसेच कार्य यांची प्रशंसा केली शिक्षकांसाठी अहोरात्र झटणारी संघटना म्हणून या संघटनेचे कार्य अतुलनीय आहे त्याचप्रमाणे विविध उपक्रम राबवून ही संघटना शिक्षकांची एक प्रेरणा देणारी संघटना आहे असे देखील गौरवोदगार काढले. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन अपूर्वा घरत यांनी केले तर आभार प्रदर्शन सुचिता जोशी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या संघटनेचे हेमंत गावंड, अजित जोशी, नरेश म्हात्रे, उपेंद्र ठाकूर, अनिल म्हात्रे,सर्वेश्वर ठाकूर,कल्पना पाटील, सुचिता जोशी, प्रमिला गावंड व अन्य सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.