सातारा : सातारा येथे झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रत्यक्ष 10 लाखाहून अधिक तर ऑनलाईन साडे सात कोटी नागरिक सहभागी झाले. हे सर्व सातारकर, साहित्य परिषद, मावळा फौंडेशनचे पदाधिकारी व प्रशासनामुळे शक्य झाले. 99 वे साहित्य संमेलन सातारकराच्या कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी संपूर्ण प्रशासनाचे आभार मानत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. अटकेपार साहित्य संमेलनाच्या डिजिटल स्मरणिकेचे प्रकाशन केले. ही स्मरणिका 18 लाख लोकांपर्यंत डिजीटल पद्धतीने पोहचविण्यात आली. 99 व्या साहित्य संमेलनाचे हे एक अगळे वेगळे वैशिष्ट ठरले.मंत्री भोसले यांच्या सुरुची निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, नगराध्यक्ष अमोल मोहिते, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, रविंद्र बेडकीहाळ, मुकुंद फडके आदी उपस्थित होते.
सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनाने विक्रमांचे अनेक मापदंड निर्माण केले. या साहित्य संमेलनात 10 कोटी रूपयांहून अधिक किमतीच्या पुस्तकांची विक्री झाली. साहित्य संमेलनातील मुख्य कार्यक्रमांसह गजल कट्टा, कवी कट्टा, बाल कट्टा, प्रकाशन कट्टया नागरिकांची उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शंभरावे साहित्य संमेलन पुणे येथे होत असले तरी सातारा येथे झालेल्या 99 व्या साहित्य संमेलनाच्या आठवणी कधीही पुसल्या जाणार नाहीत. या साहित्य संमेलनाला पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, पोलीस, शिक्षण, सहकार विभागाचे, नगर प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय यांच्यासह सर्व विभागांचे मोलाचे सहकार्य केले असल्याचे मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.
साहित्य संमेलनाची स्मरणिका निर्मितीमध्ये मुकुंद फडके यांच्यासह योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. ही डिजीटल स्मरणिका 18 लाख लोकांपर्यंत पोहचविली जाणार असून हा ही एक आगळा वेगळा विक्रमच ठरेल. याशिवायही साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळावरुन ही स्मरणिका डाऊनलोड करता येईल.मराठी नाट्य संमेलन यजमान पद साताराला मिळण्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत व नाटय संमेलनाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्याशी चर्चा झाली आहे. नाट्य संमेलन सातारा जिल्ह्याला मिळाल्यास त्योचही भव्यदिव्य असे आयोजन करण्यात येईल, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.