सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मी आयुष्यातील सर्व आनंद उपभोगलाय, गमावण्यासारखं काहीच नाही, माझ्या नादाला लागलात तर... गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
  • मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
  • राज ठाकरे यांची लाडकी बहीण योजनेवर घणाघाती टीका; “1500 रुपये 15 दिवसांत संपतात”
  • आम्ही भाजपचे बाप, वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपची जिरवू; महादेव जानकर कडाडले
 जिल्हा

सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांची सतर्कता गरजेची – सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव

डिजिटल पुणे    10-01-2026 11:08:06

मुंबई : हल्ली ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून ऑनलाईन आर्थिक व्यवहारांतील अपप्रकार, फसवणुकीच्या घटनांमध्येही  वाढ होत आहे. अशा प्रकारचे आर्थिक नुकसानीचे गैरप्रकार टाळण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहारात खबरदारी घेत सर्तकतेने सुरक्षित व्यवहार करणे गरजेचे असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव यांनी सांगितले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या वतीने मंत्रालयात आयोजित ‘आर्थिक व्यवहाराविषयी जनजागृती’ सत्रात बच्छाव बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक गोविंद अंहकारी, रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापक शिल्पा छेडा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सहायक महाव्यवस्थापक बच्छाव म्हणाले की,  खबरदारी घेतल्यास ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे करता येऊ शकतात. यादृष्टीने ग्राहकांनी कायम आपले ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा सीव्हीव्ही क्रमांक दुसऱ्या कोणालाही सांगू नयेत. तसेच, बँक किंवा कोणतीही अधिकृत संस्था फोन, मेसेज किंवा ई-मेलद्वारे अशी माहिती कधीही मागत नाही. अशा प्रकारचा फोन किंवा दूरध्वनी आल्यास तो फसवणुकीचा असण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन माहिती देऊ नये. बँकिंग, यूपीआय, वॉलेट, ऑनलाईन खरेदी अशा व्यवहारांमध्ये थोडासा  निष्काळजीपणा ग्राहकांना मोठ्या आर्थिक नुकसानीकडे नेऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आपल्या सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी नेहमी ग्राहकांनी अधिकृत अ‍ॅप्स व संकेतस्थळांचाच वापर करावा. अ‍ॅप डाउनलोड करताना गुगल प्ले स्टोअर किंवा अधिकृत अ‍ॅप स्टोअरचाच वापर करावा. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे. ई-मेल किंवा मेसेजमधील लिंक उघडण्यापूर्वी ती अधिकृत आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे. ऑनलाईन व्यवहारासाठी सहज लक्षात न येणारा मोठा, संमिश्र  पासवर्ड वापरणे आणि तो नियमितपणे बदलणे महत्त्वाचे आहे. एकाच पासवर्डचा अनेक ठिकाणी वापर टाळावा. शक्य असल्यास दोन स्तरांची सुरक्षा सक्रिय ठेवावी, असे सहायक महाव्यवस्थापक बच्छाव यांनी सांगितले.

सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवर बँकिंग किंवा आर्थिक व्यवहार कटाक्षाने टाळावेत. अशा नेटवर्कवरून माहिती चोरीला जाण्याचा धोका अधिक असतो. व्यवहारानंतर खात्याचा तपशील, मेसेज व ई-मेल नियमित तपासणे गरजेचे आहे. फसवणुकीची शंका आल्यास किंवा पैसे चुकीने वजा झाल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधावा तसेच सायबर क्राईम हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी. लवकर तक्रार केल्यास नुकसान टाळण्याची शक्यता वाढते,असे बच्छाव यांनी सांगितले.

व्यवस्थापक शिल्पा छेडा म्हणाल्या की, भारतीय रिझर्व्ह बॅकेमार्फत ग्राहकांच्या सेवेकरिता तक्रार निवारण सुविधा उपलब्ध आहे. जर तुमची बँक ग्राहकांना त्यांच्या बँक खात्याशी संबंधित तक्रारींबाबत समाधानकारक उपाय देत नसेल किंवा तक्रारींच्या अनुषंगाने तत्परतेने ठोस कारवाई करत नसेल, तर अशा प्रकरणात संबंधित ग्राहक रिझर्व्ह बँकेकडे आपली तक्रार नोंदवू शकतात. ग्राहक आपली तक्रार ईमेल किंवा पत्राद्वारे दाखल करु शकतात. या जनजागृती सत्रास मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती