नवी दिल्ली : एक कलाकार म्हणून कला आणि आपल्या संस्कृतीविषयी बोलताना मिळणारा आनंद हा शब्दांत व्यक्त न करण्याजोगा असतो. महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच असा अनुभव घेताना मला मनापासून समाधान वाटत आहे. दिल्लीसारख्या महानगरात, जिथे विविध प्रांतांचे लोक येतात, तिथे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची चव पोहोचवणे हे अभिमानास्पद कार्य आहे, अशा शब्दांत लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी दिल्लीतील मराठी संस्कृती संवर्धनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित ‘मकर संक्रांती महोत्सव’ व ‘हुरडा पार्टी’चे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे उपस्थित होते.यावेळी जाधव म्हणाले, महाराष्ट्रात हुरडा पार्टीचा आनंद सर्वजण घेतोच, पण परराज्यात आपल्या माणसांसाठी अशी मेजवानी मिळणे, ही मोठी पर्वणी आहे. या उपक्रमामुळे दिल्लीतही महाराष्ट्राचा सुगंध दरवळतो आहे. सर्व दिल्लीकरांनी या गावरान मेजवानीचा आस्वाद घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राची समृद्ध परंपरा सर्वदूर पोहोचवणे हेच आमचे ध्येय – निवासी आयुक्त आर. विमला
निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी या महोत्सवाच्या सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे अटकेपार झेंडा फडकवून महाराष्ट्राची प्रचिती दिली, तोच सांस्कृतिक वारसा आज दिल्ली दरबारात आणि संपूर्ण देशात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. मकर संक्रांत हा सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो, या विविधतेतील एकता जपत महाराष्ट्राची विशेष खाद्य संस्कृती, विशेषतः ‘हुरडा’ आणि मराठमोळ्या परंपरा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा आमचा मानस आहे.” ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या भावना आणि संस्कृती अधिक प्रभावीपणे मांडली जात असून, यातून महाराष्ट्राची एक वेगळी ओळख दिल्लीत निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खाद्योत्सव आणि रानमेव्याच्या माध्यमातून बचत गटांना हक्काची बाजारपेठ – निवासी आयुक्त सुशील गायकवाड
या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे काम केले जात असल्याचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी नमूद केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. या उत्सवांच्या निमित्ताने अस्सल ‘रानमेवा’ आणि विविध स्थानिक उत्पादनांची विक्री दिल्लीत होत असून, यामुळे बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी मदत होत आहे. दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या चवींची ओळख करून देण्यासोबतच, मराठी माणसाला एकत्र जोडणारी ही कार्यक्रमांची मालिका भविष्यातही सातत्याने सुरू ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या महोत्सवात सोलापूर, ठाणे, पुणे, जळगाव, रायगड, परभणी, अहिल्यानगर, जालना आणि नाशिक अशा विविध जिल्ह्यांतील महिला बचत गटांनी सहभाग घेतला असून एकूण १६ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये ‘उमेद’चे (राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) १० आणि कृषी विभागाचे ६ स्टॉल आहेत. महोत्सवात ज्वारीच्या कोवळ्या हुरड्यासोबत खमंग लसूण चटणी, शेंगदाणा कूट, गूळ, साजूक तूप आणि ताक यांची रेलचेल आहे. तसेच चुलीवरचे वाफाळलेले पिठलं-भाकरी, भरीत-भाकरी, बटाटेवडे, भजी, ऊस, बोरं आणि ओला हरभरा अशा अस्सल गावरान पदार्थांचा आस्वाद खाद्यप्रेमी घेत आहेत. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त कॉपर मेटलचे दागिने आणि हस्तकला वस्तू हे देखील आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे सादरीकरणही येथे करण्यात आले आहे. यामध्ये महाडीबीटी पोर्टल, कृषी सल्ल्यासाठी ‘महाविस्तार ॲप’ आणि राज्यामध्ये एकूण ३८ पिकांना मिळालेले जीआय (GI) मानांकन याविषयीची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच संक्रांत सणानिमित्त वापरण्यात येणारे बोर, ऊस, हरभरा आणि लहान मुलांच्या ‘बोरनहान’साठी लागणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन रांगोळीच्या माध्यमातून आकर्षकरीत्या मांडले आहे.
व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी सूत्रसंचालन केले. महाराष्ट्र परिचय केंद्राचे माहिती संचालक हेमराज बागुल यांनी आभार मानले.११ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात सहभागी होऊन महाराष्ट्राचे आदरातिथ्य आणि संस्कृतीचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.