सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मी आयुष्यातील सर्व आनंद उपभोगलाय, गमावण्यासारखं काहीच नाही, माझ्या नादाला लागलात तर... गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
  • मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
  • राज ठाकरे यांची लाडकी बहीण योजनेवर घणाघाती टीका; “1500 रुपये 15 दिवसांत संपतात”
  • आम्ही भाजपचे बाप, वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपची जिरवू; महादेव जानकर कडाडले
 राजकारण

अजितदादांनी पुणेकरांना मोफत प्रवासाची स्वप्नं दाखवली; गुन्हेगार उमेदवारांवर प्रश्न विचारताच ‘उडवाउडवी’ची उत्तरं देत विषय संपवला

डिजिटल पुणे    10-01-2026 13:04:25

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे हमीपत्र जाहीर केले. या हमीपत्रात मोफत प्रवास, वाहतूक कोंडीवर उपाय, पायाभूत सुविधा आणि शहराच्या सर्वांगीण विकासाचे मोठे दावे करण्यात आले. मात्र, याच कार्यक्रमात पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर अजित पवारांनी ठोस भूमिका न मांडता उडवाउडवीची उत्तरं दिल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

विकासाची आश्वासनं, पण गुन्हेगारीवर मौन?

पुण्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे, तितकाच गंभीर मुद्दा म्हणजे शहरातील वाढती गुन्हेगारी. कोयता गँग, टोळी युद्ध, दिवसाढवळ्या हत्या आणि वाढती दहशत यामुळे पुणे राज्यासह देशभरात चर्चेत आले आहे. अशा पार्श्वभूमीवर, पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांकडून गुन्हेगारीवर ठोस आणि स्पष्ट भूमिका अपेक्षित होती. मात्र, या मुद्द्यावर त्यांनी गांभीर्य दाखवले नाही, अशी टीका होत आहे.

आंदेकर कुटुंबाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित कुटुंबातील दोन सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींनाही आयुष कोमकर हत्या प्रकरणात अटक झाली असून त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अशा परिस्थितीत, तुरुंगात असलेले उमेदवार निवडणूक लढवत असताना पक्षाची भूमिका काय, असा थेट प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.

प्रश्न विचारताच ‘उडवाउडवी’

गुन्हेगारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबाबतचा प्रश्न विचारताच अजित पवारांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरं देत विषय टाळल्याचे दिसून आले. यामुळे “पुण्यातील गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महिन्यात तीन-तीन खून, नागरिकांमध्ये दहशत

पुण्यात सध्या रस्त्यावरच हत्या होत आहेत. टोळी संघर्षातून एका महिन्यात तीन-तीन खून होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोयता गँगसारख्या टोळ्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वेळी उपमुख्यमंत्री आणि शहराच्या कारभारावर प्रभाव असलेले नेते गुन्हेगारीबाबत हलक्याफुलक्या प्रतिक्रिया देतात, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुन्हेगारांना अप्रत्यक्ष पाठबळ?

अजित पवारांच्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुन्हेगारीवर बोलणं टाळणं म्हणजे गुन्हेगारांना अप्रत्यक्ष पाठबळ देणं आहे का? गुन्हेगारीचं उदात्तीकरण केलं जात आहे का? की हा विषय जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जात आहे? असे सवाल आता पुणेकरांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती