नाशिक : नाशिकमधील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकार जाती-धर्माच्या नावाखाली लोकांना भुलवून मते मिळवत असल्याचा आरोप करत त्यांनी लाडकी बहीण योजना योजनेच्या मर्यादा एका वाक्यात स्पष्ट केल्या.
राज ठाकरे म्हणाले, “महागाई किती वाढली आहे. 1500 रुपये फक्त 15 दिवसांत संपतात. घरगुती गॅस सिलेंडरच 1000 रुपयांचा झाला आहे, मग अशा वेळी 1500 रुपये कसे टिकणार?” या योजनांमुळे तात्पुरता दिलासा मिळेल, पण दीर्घकालीन विकासाकडे दुर्लक्ष होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मतदारांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, अशा पैशांना भुलून मतदान केल्यास पुढील पिढ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. “तुमची मुले उद्या म्हणतील—आमच्या शहराचा विकास झाला नाही, आमच्या भवितव्याचा विचार कोणी केला नाही,” असे म्हणत त्यांनी मनसे-शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार वर्षे पुढे ढकलल्याबद्दलही त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. भाजपवर टोला लगावत ते म्हणाले, “1952 साली जन्माला आलेल्या पक्षाला 2026 मध्येही दुसऱ्याची पोरे दत्तक घ्यावी लागतात.”तसेच, तपोवनातील वृक्षतोडीवरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत राज ठाकरे म्हणाले की, पक्षातील कार्यकर्त्यांना बाजूला करून बाहेरून लोक आणले जात आहेत. नाशिकला ‘दत्तक’ घेण्याच्या घोषणांवरूनही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.एकूणच, नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांनी आक्रमक शैलीत महायुती सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विकास, महागाई आणि लोकशाही प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले.