मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी वचननामा जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. सुमारे दोन लाख नागरिकांच्या सूचनांचा अभ्यास करून हा वचननामा तयार करण्यात आल्याचा दावा महायुतीकडून करण्यात आला आहे.वचननाम्यात झोपडपट्टीमुक्त मुंबई, २० ते ३५ लाख घरांची निर्मिती, पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती, धारावीचा पुनर्विकास, लाडक्या बहिणींना बेस्ट बस भाड्यात ५० टक्के सवलत अशा अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
मुंबईचा कायापालट करणार – एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचा वचननामा जाहीर करत आहोत. हा वचननामा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारा आहे. १६ तारखेला महायुतीचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकणार.”ते पुढे म्हणाले की, मराठी माणसाचे हित जपणे, मुंबईची संस्कृती टिकवणे आणि मुंबईकरांना मुंबईबाहेर स्थलांतरित व्हावे लागू नये, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पागडीमुक्त मुंबई, झोपडपट्टीमुक्त मुंबई आणि जलद पुनर्विकास यावर भर देण्यात येणार आहे.
लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये ५० टक्के सवलत
महायुतीच्या वचननाम्यात लाडक्या बहिणींसाठी बेस्ट बस भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी व लघु उद्योग सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.
धारावीचा विकास डीआरपी करणार
धारावीच्या पुनर्विकासाबाबत स्पष्ट भूमिका मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धारावीचा विकास डीआरपीमार्फत केला जाईल आणि ३५० स्क्वेअर फूटपर्यंतची घरे धारावीतच दिली जातील. पुनर्विकासात कोणताही विलंब होऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकरांना मुंबईबाहेर जाऊ देणार नाही – फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इतर वचननाम्यांपेक्षा आमचा ट्रॅक रेकॉर्ड मजबूत आहे. पुढील पाच वर्षांत आम्ही काय काम केले, याचा अहवाल जनतेसमोर मांडू. मुंबईकरांना मुंबईबाहेर जावे लागू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प राबवले जातील.”
वचननाम्यातील ठळक घोषणा
पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती
२० ते ३५ लाख घरांची निर्मिती
गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार
बेस्ट बसेसची संख्या ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत वाढवणार
२०२९ पर्यंत बेस्ट पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार
महिलांना बेस्टमध्ये ५० टक्के सवलत
लघु उद्योजकांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
मराठी भाषा विभागाची स्थापना
मराठी कला केंद्र व अभ्यासिकांची उभारणी
बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठाची स्थापना
झोपडपट्टीमुक्त आणि पागडीमुक्त मुंबई
रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबईचा निर्धार