मुंबई : मुंबईत महायुतीचा वचननामा प्रसिद्ध करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार शब्दांत टीका केली. “श्रेय चोरणारी टोळी सध्या सक्रिय झाली असून त्यांनी केलेली नाहीत अशी कामंही आता आपल्या नावावर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे,” असा आरोप शिंदे यांनी केला.
मुंबईबाहेर गेलेल्या मूळ मुंबईकराला पुन्हा सन्मानाने मुंबईत परत आणणं हे महायुतीचं उद्दिष्ट असल्याचं सांगत, “वसई-विरार, बदलापूर-वांगणीपर्यंत मराठी माणूस स्थलांतरित होण्याला जबाबदार कोण, हा सवाल जनता महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्यांना विचारेल,” असं शिंदे म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या आरोपांची झड
शिंदे यांनी ठाकरे गटावर विविध घोटाळ्यांचे आरोप करताना म्हटलं की, “खिचडीमध्ये भ्रष्टाचार, मिठी नदीत पैसे खाल्ले, बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले आणि अगदी कफन घोटाळाही केला. रस्त्याच्या डांबरीकरणात पैसे खाणारे आज विकासकामांचं श्रेय घेऊ पाहत आहेत.”
मराठीवरचं प्रेम ‘पुतना मावशीचं’
मराठी भाषेबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “ते नेहमी मराठीचा कंठशोष करतात, मात्र त्यांच्या वचननाम्यात मराठीचा साधा उल्लेखही नाही. त्यांचं मराठीवरचं प्रेम हे ‘पुतना मावशीचं प्रेम’ आहे.”
‘कामचोर टोळी कोण?’
झोपडपट्टीमुक्त मुंबई हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं, मात्र गेल्या अनेक वर्षांत त्यावर काहीच काम झालं नाही, असा आरोप करत शिंदे म्हणाले, “महायुती सरकारने रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. आम्ही श्रेय चोरणारे नाही, उलट कामचोर टोळी कोण आहे हे जनतेने पाहावं.”
वचननामा नव्हे, ‘टोमणेनामा’
“२५ वर्षे रखडलेले एसटीपी प्रकल्प आम्ही पूर्ण केले. मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या नावाखाली काही लोकांनी फक्त ‘गाळ’ म्हणजेच पैसा खाल्ला,” असा आरोप करत शिंदे म्हणाले, “त्यांच्या वचननाम्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेखही नाही. त्यांना हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांचा वचननामा म्हणजे फक्त ‘टोमणेनामा’, ‘घोटाळेनामा’ आहे; आमचा मात्र ‘विकासनामा’ आहे.”