उरण : ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी जे एन पी ए टाऊनशिपमध्ये आयोजित "एक मुक्त संवाद" कार्यक्रमात हेमलकसा येथील त्यांच्या ५० वर्षांच्या संघर्षाचा पट उपस्थितांसमोर मांडला.आदिवासी बांधवांना आरोग्य, शिक्षण आणि आत्मनिर्भरता प्रदान करताना आलेल्या अडीअडचणी आणि त्यातून मार्ग काढताना मिळालेला आनंद त्यांनी व्यक्त केला.
"समाजसेवा ही केवळ जबाबदारी नसून ते एक व्रत आहे," असे प्रतिपादन डॉ. आमटे यांनी केले. "आदिवासींच्या अंधारमय जीवनात प्रकाशाचा किरण पोहोचवण्यासाठी केवळ औषधांची नाही तर माणुसकीच्या स्पर्शाची गरज असते," असे ते म्हणाले.डॉ. आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी हेमलकसा येथील त्यांच्या कामाचा अनुभव सांगितला. त्यांच्या साध्या राहणी आणि उच्च विचारसरणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अंतर्गत डॉ. आमटे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना जीवनातील साधी पण महत्त्वाची तत्वे उलगडली.जे एन पी ए बोर्ड सदस्य दिनेश पाटील, रवींद्र पाटील, कामगार नेता गणेश घरत, निमंत्रक संगीता पाटील आणि समन्वयक संतोष बहिरा यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.मनीषा जाधव (महाप्रबंधक प्रशासन सचिव), सुरेश बाबू (मुख्य महाप्रबंधक) आणि कॅप्टन बाळासाहेब पवार (उपसंरक्षक) यांची प्रमुख उपस्थिती होती.