उरण : १३ जानेवारी २०२६ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या, वीर वाजेकर, आर्ट, सायन्स व कॉमर्स कॉलेज, महालण विभाग फुंडे येथे लोकनेते दि .बा. पाटील यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.उरण, पनवेल व रायगडचे भाग्यविधाते लोकनेते दि. बा. पाटील यांच्याविषयी मनोगत व्यक्त करतांना प्र. प्राचार्य, डॉ.आमोद ठक्कर यांनी आपले अनुभव सांगितले. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय नेता असा असामान्य प्रवास उलगडून दाखविताना दि. बा.पाटील यांचे शिक्षण,वकिली सामाजिक कार्यकर्ता आणि पुढे विधानसभा सदस्य ते संसदेपर्यंतचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला. पनवेल, उरण मतदार संघाचे पाच वेळा आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते विधान परिषद सदस्य म्हणून काम केले.
सामाजिक चळवळीतील अग्रणी नेता, भूमिपुत्रांचे तारणहार, सिडको जमीन संपादनास रक्तरंजीत तीव्र विरोध, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणुन संघर्ष करणारे क्रांतीसुर्य दि.बा. पाटील यांनी सिडको पुनर्वसन योजनेसाठी दिलेला लढा, साडेबारा टक्के च्या विकसित भूखंडाचा मोबदला, राखीव जागा समर्थन समिती स्थापन करून त्याद्वारे महाराष्ट्र राज्यात घेतलेल्या सभा, मंडल आयोग, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सक्रिय सहभाग, त्यासाठी अकरा महिन्याचा त्यांना झालेला तुरुंगवास, कुलाबा लोकल बोर्डाच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा, कुळ कायदा, रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखा स्थापन करून त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्याने नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी केलेले आग्रही प्रयत्न, पूरग्रस्त समितीच्या माध्यमातून केलेले कार्य, तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जाणारे नेतृत्व, समाजातील अनिष्ट चालीरीतींना केलेला विरोध,कायद्याचा उत्तम अभ्यास, त्याचबरोबर उत्तम वक्तृत्व शैली, करारी आवाज, मुद्देसूद बोलणे, अशा दि.बा. पाटील यांच्या खंबीर नेतृत्व व असामान्य कर्तुत्वाचा प्रेरणादायी जीवनपट प्र. प्राचार्य, डॉ. आमोद ठक्कर यांनी उलगडून दाखविला. विद्यार्थ्यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या कार्याची कास धरून पुढे वाटचाल करावी व त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून उत्तम नागरीक बनावे असे आवाहन त्यांनी केले.
ठक्कर सरांनी स्वतः दि. बा.सोबत काम करतानाचे अनेक उदाहरण व अनुभव सांगितले.लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेताना त्यांचे शिक्षण, समाजकारण, राजकारण, आदी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. जासई, पिरकोन, पनवेल महाविद्यालयची स्थापना व त्याचबरोबर वीर वाजेकर महाविद्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम त्या माध्यमातून तळागाळातील लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्याचबरोबर त्यांच्या राजकीय उल्लेखनीय अशा विविध पदावर काम करीत असतानाच्या त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण प्रास्तविक डॉ.सुजाता पाटील यांनी केले.कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल पालवे,प्रा.गजानन चव्हाण तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.डॉ.सी.डी.धिंदळे यांनी आभार मानले.