उरण : "देशाच्या राजकारणात आदराने नावे घ्यावीत अशा मोजक्या नामवंतांमध्ये दिबांचे कार्य आणि आदर्श आहे. ओबीसी, मंडल आयोगाचे अग्रणी तेच आहेत आणि १९८४ च्या भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या गौरवशाली, शौरशाली, ऐतिहासिक लढ्याचे नेतृत्व त्यांनीच केलेले आहे. त्या ऐतिहासिक आंदोलनात पाच हुतात्मे झालेत. तरीही सरकार अद्यापही विमानतळाला नाव देत नाही, ही शोकांतिका आहे. आज दिबांची शंभराची जयंती, त्यामुळे हे औचित्य साधून सरकारने तातडीने दिबांचे नाव विमानतळाला द्यावे. सरकारने विमानतळाला दिबांचे नाव दिले तर तीच दिबांना खरी श्रद्धांजली ठरेल," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत जासई येथे दिबांना अभिवादन करताना म्हणाले. यावेळी जासई ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल येथील 'संग्राम' बंगला आणि आगरी समाज सभागृह येथेही महेंद्रशेठ घरत यांनी दिबांना अभिवादन केले. दिबांच्या स्मृतींना रांगोळीच्या माध्यमातून उजाळा दिलेला पाहून महेंद्रशेठ आनंदीत झाले. रांगोळीकारांचे कौतुक केले. यावेळी दिबांचे पुत्र अभय पाटील, अतुल पाटील, स्नुषा मनीषा पाटील आदी उपस्थित होते.