हिंगोली : नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नऊ समाजासह इतरही भाविकांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती व्हावी, यासाठी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोहरादेवी गडाचे महंत सुनीलजी यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले.यावेळी नांदेड क्षेत्रिय समितीचे अशासकीय सदस्य अॅड. संतोष राठोड, हरनामसिंह चव्हाण, सतवतसिंह चव्हाण, राज्य समन्वयक तेजासिंह बावरी, रथ जिल्हा समन्वयक अंबादास दळवी, संतोष जाधव, मलकितसिंह भाटीया, दिलीप राठोड, डॉ. आकाश राठोड यांच्यासह समजाबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या चित्ररथासोबत पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज जिल्ह्यातील तांड्यांवर जावून समाज जनजागृती करणार आहेत. या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, हा मुख्य उद्देश आहे. हे दोन्ही रथ जिल्ह्यातील वस्ती, तांड्यांवर जावून ‘हिंद दी चादर’ या विशेष कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एक चित्ररथ आणि एक एलईडी रथाच्या माध्यमातून सिख – सिकलिगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाज या सर्व नऊ समाजामधील भाविकांमध्ये नांदेड येथे होणाऱ्या हिंद दी चादर या श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाची जनजागृती करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजबांधवांकडे विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष कार्यक्रमाचे चित्ररथाद्वारे सादरीकरण
नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष कार्यक्रम हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील प्राथमिक शाळेत चित्ररथाच्या माध्यमातून सादर करण्यात आला.
या चित्ररथाद्वारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान, धर्मस्वातंत्र्य व मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची माहिती विद्यार्थ्यांना व नागरिकांना प्रभावीपणे देण्यात आली. चित्ररथातील दृकश्राव्य माध्यमे, माहितीफलक व संदेशफलकांद्वारे त्यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, सहिष्णुता, धर्मसहिष्णुता व राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, हा उद्देश अधोरेखित करण्यात आला. या उपक्रमास शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.