पिरंगुट : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात स्व. अनंतराव पवार साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षा कार्यशाळा’ उत्साहात संपन्न झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये मागे राहू नयेत, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धा परीक्षांची ओळख, बदलते स्वरूप, अभ्यासाची योग्य दिशा, यशस्वी अधिकाऱ्यांचे अनुभव आणि विविध स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन मिळावे, या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो हे होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुळशी तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मा. श्री. विजयकुमार चोबे, गट विकास अधिकारी मा. श्री. सुधीर भागवत तसेच सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) महाराष्ट्र शासन मा. श्री. प्रतीक निकम उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य यशवंत गोवेकर, मा. श्री. प्रदीप पाटील, प्रा. भरत कानगुडे, मा. निखत शेख, डॉ. श्रीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेची सुरुवात महाराष्ट्र गीत व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. मार्गदर्शन करताना मा. तहसीलदार श्री. विजयकुमार चोबे यांनी विद्यार्थ्यांना नशिबावर विसंबण्यापेक्षा स्वतःच्या कष्टांवर आणि मनगटाच्या बळावर ध्येय निश्चित करण्याचा सल्ला दिला. स्पर्धा परीक्षांमध्ये भूतकाळातील चुका विसरून आजचे योग्य नियोजन किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला. अभ्यास साहित्याची निवड, अभ्यासाची दिशा तसेच प्रशासकीय सेवेत प्रामाणिकपणा आणि कणखरपणा आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
गट विकास अधिकारी मा. श्री. सुधीर भागवत यांनी स्पर्धा परीक्षा का द्यावी, हे आधी निश्चित करण्याचा सल्ला देत ध्येय, अभ्यास, सातत्य, नियोजन आणि प्रामाणिकपणा या स्पर्धा परीक्षेच्या पंचसूत्रीचे सविस्तर विवेचन केले. क्रमिक अभ्यासक्रमाचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
मा. श्री. प्रतीक निकम यांनी त्यांच्या अभ्यास अनुभवांवर आधारित मार्गदर्शन करत स्पर्धा परीक्षांचे बदलते स्वरूप, प्रश्नपत्रिकांचे प्रकार, गुण विभागणी, पर्यायी विषयांची निवड, मुलाखत प्रक्रिया, वाचन पद्धती व संदर्भ ग्रंथांचे महत्त्व यावर सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शकांनी सखोल चर्चा करून शंकांचे निरसन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी आजच्या विद्यार्थ्यांना करिअरची दिशा ठरवताना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करत, योग्य मार्गदर्शन व नियोजनातून यश निश्चित साध्य करता येते, असे सांगितले. पुढील स्मृतिदिनी वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री. राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, उपसचिव मा. श्री. एल. एम. पवार, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, प्रशासकीय सहसचिव मा. श्री. ए. एम. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. श्रीकांत देशमुख यांनी काम पाहिले.
स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख डॉ. श्रीकांत देशमुख यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. भरत कानगुडे यांनी प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजय बालघरे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. भरत कानगुडे यांनी केले.कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील तसेच मुळशी तालुक्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते