मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदान करून परतलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांकडून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटावर पारंपरिक शाईऐवजी मार्करने खूण करण्यात येत आहे. मात्र हा मार्कर सहजपणे पुसला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, “मार्करने केलेली खूण नखावर असते आणि ती काही प्रमाणात पुसली जाऊ शकते,” अशी कबुली दिली आहे.
केवळ मुंबईच नव्हे तर कोल्हापूरमधील कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूल येथील मतदान केंद्रावरही काही मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
शाईऐवजी मार्करचा वापर का?
राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा शाईऐवजी मार्कर किट उपलब्ध करून देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, हा मार्कर 2012 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरला जात आहे, असा दावा करण्यात आला आहे.
PADU मशीनवरही वाद
निवडणूक आयोगाने यंदा PADU (Printing Auxiliary Display Unit) नावाचे नवीन मशीन काही वॉर्डमध्ये ईव्हीएमला बॅकअप म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाची माहिती शेवटच्या क्षणी देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यापूर्वी कधीही PADU मशीन वापरण्यात आले नव्हते. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
माध्यम प्रतिनिधींना प्रवेशास मनाई
मतदानाच्या दिवशी सकाळीच राज्य निवडणूक आयोगाने आणखी एक वादग्रस्त निर्णय घेत माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश नाकारला. ऐन मतदानाच्या वेळी घेतलेल्या या निर्णयामुळेही अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
सकाळी 9.30 वाजेपर्यंतचे मतदानाचे टक्केवारी आकडे
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये सकाळच्या वेळेत पुढीलप्रमाणे मतदान नोंदले गेले आहे –
बृहन्मुंबई महानगरपालिका – 6.98%
छत्रपती संभाजीनगर – 7 ते 8% (सकाळी 7 ते 8 दरम्यान)
पुणे – 5.5% (पहिल्या दोन तासांत)
सोलापूर – 6.86% (7.30 ते 9.30)
सांगली–मिरज–कुपवाड – 6.45%
परभणी – 9.10%
मालेगाव – 11.09%
अमरावती – 6.6%