मुंबई : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सामान्य नागरिकांसह बॉलिवूड कलाकार आणि क्रीडापटूंनीही मतदान केंद्रांवर हजेरी लावून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत सकाळपासूनच अनेक सेलिब्रिटी मतदानासाठी मतदान केंद्रांवर पोहोचले. सर्वात आधी मतदान करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्ना, अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांचा समावेश होता. अभिनेत्री तमन्ना भाटियाने सकाळीच मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केले. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही मतदानाचा हक्क बजावत मुंबईकरांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
दादर येथील बालमोहन विद्यामंदिर येथे अभिनेते नाना पाटेकर यांनी मतदान केले. अभिनेता आमिर खानच्या कुटुंबीयांनीही मतदानाचा हक्क बजावला. आमिर खानची मुले आणि त्याची माजी पत्नी रिना दत्ता यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
अभिनेत्री सान्या मल्होत्राने सकाळीच मतदान करून लोकशाहीप्रती आपली जबाबदारी पार पाडली. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांनीही मतदानानंतर मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. अभिनेता जॉन अब्राहम, चित्रपट निर्माती झोया अख्तर आणि अभिनेत्री दिव्या दत्ता यांनीही मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर मतदान केले.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासह गुरुवारी सकाळी वांद्रे पश्चिम येथे मतदान केले. अभिनेता सुनील शेट्टी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. तसेच ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी मतदान करून लोकशाहीप्रती आपली जबाबदारी पार पाडली.सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे मतदान केंद्रांवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.