पुणे : महानगरपालिका निवडणुकांदरम्यान मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई सहज पुसली जात असल्याने बोगस मतदान होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३४ मध्ये काही महिला व अल्पवयीन मुले बोटावरील शाई लिक्विड किंवा फिनरने पुसून पुन्हा मतदान करत असल्याचा दावा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केला असून, यासंदर्भात त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
यंदाच्या निवडणुकांमध्ये पारंपरिक अमिट शाईऐवजी मार्कर पेन (Voting Ink Mark) चा वापर करण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील नऱ्हे, वडगाव बुद्रुक आणि धायरी परिसरात शाई पुसून पुन्हा मतदान केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. धायरी फाट्याजवळील नारायणराव सणस विद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर संशयित व्यक्तीला पकडून मारहाण झाल्याची घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
दरम्यान, मुंबईतही मतदान करून परतलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मार्करने लावलेली शाई नखांवरून पुसली जात असल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. शाई त्वचेवर अधिक गडद आणि स्पष्टपणे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर आणि उल्हासनगरमध्येही अशाच तक्रारी समोर आल्या असून, उल्हासनगरमधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी शाई लगेच पुसली जात असल्याचा आरोप केला आहे.राज्य निवडणूक आयोगाने मात्र स्पष्ट केले आहे की, २०१२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा मार्कर वापरण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात शाई पुसली जात असल्याचे व्हिडिओ आणि तक्रारी समोर आल्याने आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
याशिवाय, PADU (Printing Auxiliary Display Unit) नावाच्या नवीन यंत्राच्या वापराबाबतही विरोधकांनी आक्षेप नोंदवले असून, माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश नाकारण्याच्या निर्णयामुळेही वाद निर्माण झाला आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, निवडणूक आयोग पुढील काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.