मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मतदान करून परतलेल्या काही मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “सरकारने निवडणुका जिंकायचं ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीत जे केलं तेच आता पुन्हा सुरू आहे. आजपर्यंत मतदानानंतर कायमस्वरूपी शाई लावली जात होती, पण आता मार्करने खूण केली जाते आणि ती सॅनिटायझरने सहज पुसली जाते. अशा फ्रॉड निवडणुकांमधून सत्तेत येणं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे.”
या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “निवडणुकीशी संबंधित सर्व निर्णय राज्य निवडणूक आयोग घेतो. याआधीही काही निवडणुकांमध्ये मार्करचा वापर करण्यात आला आहे. जर कुणाला शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या प्रकारच्या पेनचा वापर करावा. माझं वैयक्तिक मत आहे की ऑईल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र निवडणूक प्रक्रियेतील संस्थांवर संशय निर्माण करणे योग्य नाही.”
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. बोटावरील शाई पुसली जात असल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर पालिका प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मार्करच्या वापरामुळे खूण सहज पुसली जात असल्याचा मतदारांचा संशय आहे. यानंतर शाई त्वचेवर खोलवर बसेल अशा पद्धतीने लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, यंदा राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक शाईऐवजी मार्कर किट उपलब्ध करून दिले आहे. हा मार्कर 2012 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.