सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 शहर

चतुरस्र शास्त्रीय गायिका स्व. माणिक वर्मा यांना आदरांजली ;‘माणिक स्मृती’ सांगीतिक कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

डिजिटल पुणे    19-01-2026 10:27:44

पुणे : स्व. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माणिक स्मृती’ हा सांगीतिक कार्यक्रम शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी भारतीय विद्या भवन, सरदार महादेव बळवंत नातू सभागृह येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

चतुरस्र शास्त्रीय गायिका स्व. माणिक वर्मा यांना आदरांजली अर्पण करणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका कल्याणी जोशी यांनी सादर केलेल्या गायनाने रसिकांची मने जिंकली. माणिक वर्मा यांच्या गायकीच्या परंपरेतील रागदारी, भावसंपन्नता आणि सौंदर्य यांचे दर्शन घडवत त्यांनी आपले सादरीकरण अत्यंत संयत आणि प्रभावीपणे मांडले. हार्मोनियमवर डॉ. प्रवीण कासलीकर आणि तबल्यावर केदार टिकेकर यांनी दिलेली समरस व संवेदनशील साथ कार्यक्रमाची उंची वाढवणारी ठरली.श्याम कल्याण राग,अनृतची गोपाल,'मला मदन भासे हा' हे नाट्यपद अशा अनेक गायनप्रकार त्यांनी प्रभावीपणे सादर केले आणि रसिकांची दाद मिळवली.                                    

कार्यक्रमाचे निवेदन डॉ.अस्मि अच्युते यांनी अभ्यासपूर्ण आणि रसिकांना गुंतवून ठेवणाऱ्या शैलीत केले. त्यांनी स्व. माणिक वर्मा यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा तसेच शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा सुस्पष्ट वेध घेतला.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा २७५ वा कार्यक्रम होता. सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी कार्यक्रमाचा मनःपूर्वक आस्वाद घेतला आणि सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला.                         

‘माणिक स्मृती’ या कार्यक्रमातून स्व. माणिक वर्मा यांची गायकीची परंपरा, त्यांची भावसमृद्ध कलादृष्टी आणि शास्त्रीय संगीताला लाभलेले त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. संगीतप्रेमी रसिकांसाठी हा कार्यक्रम एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरला.


 Give Feedback



 जाहिराती