नांदेड : नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा “हिंद-दी-चादर” हा कार्यक्रम केवळ मराठवाडा किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, जागतिक पातळीवर भारताची श्रद्धा, बलिदान आणि मानवी मूल्यांची महान परंपरा अधोरेखित करणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमाकडे देश-विदेशातील भाविक, संत-महात्मे व मान्यवरांचे लक्ष वेधले जाणार असून, त्यामुळे हा कार्यक्रम जागतिक स्तरावर पोहोचवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रसिद्धी व माध्यम नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, लातूरचे उपसंचालक (माहिती) विवेक खडसे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, लातूर जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, सहायक संचालक श्याम टरके यांच्यासह माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. पापळकर पुढे म्हणाले की, हा कार्यक्रम प्रत्येक गावागावात, प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक मुलापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व माध्यमांनी समन्वयाने व सकारात्मक दृष्टीकोनातून सहकार्य करावे. माध्यमांची भूमिका या ऐतिहासिक कार्यक्रमात अत्यंत महत्त्वाची असून, समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य माध्यमांद्वारे घडू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सविस्तर नियोजनाची माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमांनी सेवेच्या भावनेतून सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.बैठकीदरम्यान माध्यम प्रतिनिधींनी आपली मते मांडली तसेच कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी व सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.