पुणे/पिंपरी-चिंचवड: काळेवाडी फाटा परिसरात शनिवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या लक्झरी स्लीपर कोच बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. ही घटना शनिवार, १७ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता, काळेवाडी फाटा–कस्पटे वस्ती रस्त्यावर एसबीआय बँकेजवळ घडली.या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अविनाश सुरेश गायकवाड असे असून तो होंडा शाईन दुचाकीवरून प्रवास करत होता. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बस अतिवेगात व बेदरकारपणे चालवली जात होती. बसचालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने दुचाकीला जबर धडक बसली. या धडकेत अविनाश गंभीर जखमी झाला आणि उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला.
या प्रकरणी एका महिला तक्रारदाराने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार पोलिसांनी लक्झरी स्लीपर कोच बसच्या चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. संबंधित बसचा क्रमांक MH 37/W 5153 असा आहे. वाकड पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
आठवड्यातील दुसरी प्राणघातक घटना
विशेष म्हणजे, याच काळेवाडी फाटा–कस्पटे वस्ती मार्गावर आठवड्याभरातील ही दुसरी जीवघेणी घटना आहे. आठवड्याच्या सुरुवातीला याच रस्त्यावर धनगर बाबा मंदिराजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सलग अपघातांमुळे हा मार्ग अपघातप्रवण ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
वारंवार घडणाऱ्या गंभीर अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या मार्गावर वेगमर्यादा, जड वाहनांवर नियंत्रण, सीसीटीव्ही व वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी तैनाती करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
सततची वाहतूक कोंडी
या सलग अपघातांमुळे काळेवाडी फाटा–कस्पटे वस्ती मार्गावर सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या धोकादायक आणि बेदरकार वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने व लक्झरी बसेस भरधाव वेगात धावत असल्याने अपघातांची शक्यता सातत्याने वाढत आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा होणारे अनधिकृत पार्किंग आणि रस्त्याकडेला उभे असलेले फेरीवाले यामुळे वाहतूक सतत विस्कळीत होत असून वारंवार कोंडी निर्माण होत आहे. अरुंद झालेल्या रस्त्यावरून वाहनांची ये-जा धोकादायक ठरत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने अनधिकृत पार्किंग हटवणे, फेरीवाल्यांचे नियोजन करणे आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर कठोर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.