सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अपघात रोखण्यासाठी ‘पीटीझेड ‘ कॅमेरे,नवले पुलाजवळ बसविले,वेगावर नियंत्रण राहणार
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
 जिल्हा

अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; जुहू परिसरात भरधाव मर्सिडीजची धडक, रिक्षा चिरडली

डिजिटल पुणे    20-01-2026 10:48:10

मुंबई :  बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील सुरक्षावाहनाचा जुहू परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास जुहू येथील थिंक जिमजवळ हा अपघात घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार आपल्या कारमधून घरी जात असताना त्यांच्या मागे सुरक्षेसाठी एस्कॉर्ट SUV होती. या SUV च्या मागे एक ऑटो रिक्षा चालत होती. याच दरम्यान मागून आलेल्या भरधाव मर्सिडीज कारने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षा चिरडली जाऊन ती थेट सुरक्षावाहनाच्या मागील भागाखाली अडकली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मर्सिडीज चालकाने धडकेनंतरही वाहन पुढे रेटत ठेवले, त्यामुळे ऑटो SUV च्या खाली अडकत गेला आणि SUV चा मागचा भाग हवेत उचलला गेला. या अपघातात ऑटो चालक बासित खान गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत SUV खाली अडकलेली ऑटो बाहेर काढली. गोंधळाचा आवाज ऐकून अक्षय कुमार स्वतः वाहनातून बाहेर आले असल्याची माहिती आहे. त्यांनी जखमी चालकाला रुग्णालयात नेण्यासाठी मदत केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या टीमने त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी नेले.

दरम्यान, जखमी ऑटो चालकाचा भाऊ समीर खान याने संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की,“माझ्या भावाची अवस्था गंभीर आहे. आम्ही गरीब आहोत. दोषी चालकाकडून उपचारांचा खर्च आणि ऑटोच्या नुकसानीची भरपाई मिळावी.”

घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मर्सिडीज कार जप्त केली असून चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र अद्याप या प्रकरणी अधिकृत एफआयआर दाखल झाल्याची माहिती नाही. अपघात निष्काळजीपणामुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे, याचा तपास सुरू आहे.

या घटनेवर अक्षय कुमार यांच्या पीआर टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना पूर्णपणे सुरक्षित आहेत.अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती