पुणे : भारतातील पहिल्यावहिल्या ‘UCI २.२’ श्रेणीतील आंतरराष्ट्रीय बहु-स्तरीय सायकलिंग स्पर्धा ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ च्या मुळशी–मावळ टप्प्यात चीनच्या ‘ली निंग स्टार’ संघाच्या ल्यूक मडग्वे याने दमदार कामगिरी करत निर्विवाद वर्चस्व गाजवले, तर भारतीय राष्ट्रीय संघाच्या हर्षवीर सिंग सेखॉन याने सर्वोत्तम भारतीय सायकलपटू ठरण्याचा मान पटकावला.हिंजवडी येथील टी.सी.एस. (TCS) सर्कल येथून सुरू झालेल्या ८७.२ किलोमीटरच्या ‘मुळशी–मावळ माईल्स’ या पहिल्या टप्प्यात ल्यूक मडग्वे याने अवघ्या २ तास २१ सेकंदात शर्यत पूर्ण करत विजेतेपद मिळवले. सुरुवातीपासूनच वेगवान आणि तांत्रिक खेळाचे दर्शन घडवणाऱ्या या टप्प्यात शेवटच्या काही क्षणांत मडग्वे याने निर्णायक आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
एस्टोनियाच्या ‘क्विक प्रो टीम’चा अँड्रियास मॅटिल्डास (०२:००:२७) दुसऱ्या, तर बेल्जियमच्या ‘टार्टलेटो–इसोरेक्स’ संघाचा योर्बेन लॉरीसन (०२:००:३०) तिसऱ्या क्रमांकावर राहिला. UCI नियमांनुसार पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंना अनुक्रमे १०, ६ आणि ४ सेकंदांचा टाइम बोनस देण्यात आला असून, तो पुढील टप्प्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, शर्यत सुरू झाल्यानंतर पहिल्या चेकपॉईंटनंतर दुसऱ्या गटातील काही सायकलपटूंमध्ये अपघात झाला. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि UCI च्या सुरक्षा प्रोटोकॉलनुसार स्पर्धा सुमारे २३ मिनिटे थांबवण्यात आली होती. वैद्यकीय आणि तांत्रिक पथकाने तातडीने मदत केल्यानंतर शर्यत पुन्हा सुरू करण्यात आली.
पहिल्या टप्प्यानंतर विविध श्रेणींतील आघाडीवर असलेल्या खेळाडूंना जर्सी प्रदान करण्यात आल्या. सर्वसाधारण वर्गीकरण आणि पॉइंट्स वर्गीकरणात ल्यूक मडग्वे याने यलो आणि ग्रीन जर्सी मिळवली. बेस्ट क्लायंबर म्हणून क्रिस्टियन रायलेनु (चीन) याला पोलका डॉट जर्सी, सर्वोत्तम आशियाई खेळाडू म्हणून जंबालजाम्ट्स सैनबयार (मंगोलिया) याला ऑरेंज जर्सी, सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून तामर स्पिएरो (नेदरलँड) याला व्हाईट जर्सी, तर सर्वोत्तम भारतीय खेळाडू म्हणून हर्षवीर सिंग सेखॉन याला ब्लू जर्सी प्रदान करण्यात आली.
या टप्प्यातील विजेत्या खेळाडूंचा गौरव खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह आदी मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.
आता सर्वांचे लक्ष उद्या, २१ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘मराठा हेरिटेज सर्किट’ या दुसऱ्या टप्प्याकडे लागले आहे. १०५.३ किलोमीटरच्या या खडतर मार्गात सायकलपटूंना १,०५१ मीटरची उंची सर करावी लागणार असून, पुरंदर किल्ला, सिंहगड आणि खडकवासला तलाव परिसरातून जाणारा हा टप्पा खेळाडूंच्या सहनशक्तीची कसोटी पाहणारा ठरणार आहे.
पुणे जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र शासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पाच दिवसांच्या स्पर्धेत ३५ देशांतील १७१ आंतरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी झाले असून, एकूण ४३७ किलोमीटरच्या या स्पर्धेमुळे पुण्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे जागतिक स्तरावर दर्शन घडत आहे.
पुढील टप्प्यांचे वेळापत्रक :
▪️ २१ जानेवारी : टप्पा २ – मराठा हेरिटेज सर्किट (१०५.३ किमी)
▪️ २२ जानेवारी : टप्पा ३ – पश्चिम घाट प्रवेशद्वार (१३४ किमी)
▪️ २३ जानेवारी : टप्पा ४ – पुणे प्राईड लूप (९५ किमी)