गडचिरोली: अंत्यविधी आटोपून घरी परतत असताना चारचाकी वाहन दीना नदीच्या पुलावरून कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात खमनचेरू–बोरी मार्गावरील दीना नदी पुलावर घडली.
अपघातात यादव विठ्ठलराव कोलपाकवार (73) आणि सुनील मुरलीधर कोलपाकवार (55) यांचा मृत्यू झाला आहे. तर अभिजीत यादव कोलपाकवार (40), अर्चना यादव कोलपाकवार आणि पद्मा सत्यनारायण कोलपाकवार हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. जखमींना प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे.
नागेपल्ली येथील आरडी एजंट रवींद्र तंगडपल्लीवार यांचा सिरोंचा मार्गावर खून झाल्यानंतर त्यांच्यावर नागेपल्ली येथे अंत्यविधी पार पडला होता. या अंत्यविधीसाठी कोलपाकवार कुटुंबीय हजर होते. अंत्यविधी आटोपून यादव कोलपाकवार, त्यांची पत्नी अर्चना, मुलगा अभिजीत, सुनील कोलपाकवार आणि पद्मा कोलपाकवार हे सर्वजण चारचाकी वाहनाने आष्टीकडे निघाले असताना हा अपघात घडला.उपचारादरम्यान यादव कोलपाकवार आणि सुनील कोलपाकवार यांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.