पुणे : राज्यात महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट) एकत्र लढणार का, याबाबत चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही गटांमध्ये एकत्रित लढण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली असून अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाने अजित पवार गटाकडे ३ जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती जागांची मागणी केल्याची माहिती आहे. युती झाली तर शरद पवार गटाचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येते. मात्र, कोणत्या चिन्हावर आणि किती जागांवर लढायचे याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून, या बैठकीत एकत्र लढण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने हालचालींना आणखी वेग आला आहे. बंडखोरी टाळण्यासाठी अद्याप एबी फॉर्म वाटप करण्यात आलेले नाही.
जुन्नरमध्ये घड्याळ, आंबेगावात थेट लढत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ या एकाच चिन्हावर लढणार असून या उमेदवारांची जबाबदारी खासदार डॉ. अमोल कोल्हेंकडे असणार आहे. तर आंबेगाव तालुक्यात मात्र तुतारी वि. घड्याळ अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्यात समेट न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
इंदापूरमध्ये घडामोडी इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत. तसेच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे हे इंदापूर पंचायत समितीच्या रिंगणात उतरणार आहेत.
‘शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी’ महापालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतही जिथे जे चिन्ह फायदेशीर ठरेल तिथे ते चिन्ह वापरण्याची रणनीती दोन्ही राष्ट्रवादीने ठरवली आहे. सर्वोच्च न्यायालयात चिन्हाबाबतचा वाद अंतिम टप्प्यात असतानाच, मैदानात मात्र दोन्ही गटांमध्ये समन्वय वाढताना दिसतोय.
महापालिकांतील पराभवानंतर दोन्ही राष्ट्रवादी अधिक जवळ आल्याचं चित्र असलं, तरी अजित पवार गटातील काही वरिष्ठ नेते एकत्र येण्याबाबत सावध भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अंतिम चित्र अर्ज छाननीनंतरच स्पष्ट होणार आहे.