मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेतील गटनेतेपदाची जबाबदारी माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, उद्धव ठाकरे यांनी त्यांना गटनेतेपदी नियुक्ती दिली आहे.
किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 199 मधून विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) उमेदवार रुपल कुसळे यांचा पराभव केला होता. महापालिकेतील प्रदीर्घ अनुभव, माजी महापौरपद आणि आक्रमक भूमिका यामुळे किशोरी पेडणेकर यांचे नाव गटनेतेपदासाठी आघाडीवर होते.गटनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून विशाखा राऊत, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव यांचीही नावे चर्चेत होती. मात्र अखेर बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.
दरम्यान, तब्बल २५ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाची एकहाती सत्ता संपुष्टात आली असून, भाजप युतीने महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाला ६५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
मुंबई महापालिकेतील पक्षनिहाय अंतिम निकाल
भाजप – 89
शिवसेना (ठाकरे गट) – 65
शिवसेना (शिंदे गट) – 29
काँग्रेस – 24
एमआयएम – 8
मनसे – 6
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 3
समाजवादी पार्टी – 2
राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 1
एकूण जागा – 227
महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला
राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता काढली जाणार आहे. नगरविकास विभागाकडून मंत्रालयात ही सोडत होणार असून, कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर असणार हे त्या दिवशी स्पष्ट होणार आहे.