सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 DIGITAL PUNE NEWS

‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेचे उत्कृष्ट व्यवस्थापन; आंतरराष्ट्रीय सायकलपटूंकडून कौतुक

डिजिटल पुणे    22-01-2026 10:40:53

पुणे : पुण्यात सध्या सुरू असलेली ‘युसीआय २.२’ श्रेणीतील ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा अत्यंत सुरक्षित असून स्पर्धेचे व्यवस्थापन जागतिक दर्जाचे असल्याच्या प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनी व्यक्त केल्या आहेत. स्पर्धा मार्गावर नागरिकांकडून होत असलेले उत्स्फूर्त स्वागत आणि प्रोत्साहन पाहून स्पर्धकांचा उत्साह अधिकच वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (युसीआय), स्वित्झर्लंड यांच्या मान्यतेने जगभरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी प्रथमच भारतात आणि त्यातही पुण्यात ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून १९ जानेवारीपासून ही स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू आहे. या स्पर्धेत जगातील पाच खंडांतील २९ संघांमधील ३५ देशांचे १७१ नामवंत सायकलपटू सहभागी झाले असून विजेतेपदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याच्या व्यस्त कार्यक्रमादरम्यान आंतरराष्ट्रीय सायकलपटूंशी संवाद साधला असता त्यांनी स्पर्धा आयोजनाबाबत समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या.

युरो सायकलिंग ट्रिप्स संघाकडून सहभागी झालेले आणि फ्रान्सचे नागरिक असलेले सायकलपटू सीमीएन ग्रीन यांनी स्पर्धेच्या व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले. ही स्पर्धा अत्यंत संघटित पद्धतीने आयोजित करण्यात आली असून रस्त्यांची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धा मार्गावर नागरिकांकडून होत असलेले स्वागत आणि प्रोत्साहन प्रेरणादायी असून काही देशांतील स्पर्धांमध्ये वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो; मात्र पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक असूनही स्पर्धेदरम्यान वाहतूक व्यवस्थापन अतिशय चोख असल्याने ही स्पर्धा सुरक्षितपणे पार पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रीन यांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीबाबतही माहिती दिली. स्पर्धेच्या आठवड्यात शक्यतो तांदळावर आधारित आहार घेतला जातो, आवडते पदार्थ टाळावे लागतात. स्पर्धेनंतर विशेष प्रोटीन पावडर दिली जाते, तर घरी असताना आहार नियोजन वेगळे असते. जेवणात अधिकाधिक भाज्यांचा समावेश केला जातो. युरोप, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या खंडांतील शंभरहून अधिक सायकल स्पर्धांमध्ये आपण सहभागी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील ब्रिटीश आयलँड्स येथील नागरिक असलेले डेलॅन हॉपकिन्स हे रुजाई इन्शुरन्स विनस्पेस संघातर्फे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पुण्यातील नागरिक अतिशय प्रोत्साहन देणारे असून त्यामुळे स्पर्धकांना विशेष ऊर्जा मिळते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्या सहा वर्षांपासून ते व्यावसायिक सायकल स्पर्धांमध्ये सहभागी असून युसीआयच्या सुमारे तीनशे स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. स्पर्धा असो वा नसो, दररोज सायकलिंग करणे ही त्यांची सवय असून स्पर्धेनंतर मसाज, तसेच कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनयुक्त आहार घेतला जातो. मात्र आहाराबाबत मोठ्या प्रमाणात बदल करता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती